विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

वाणी सरस्वतीची! श्रीकृष्णार्पणमस्तु!

लेखन व संपादन – वृंदा आशय

•| ॐ |•
पुरुषोत्तम मास कृष्ण संदेश

सरस्वतीच्या वीणेविन नाही ध्वनी
वीणेविन आता काही नाही मनी !

श्रीकृष्णार्पणमस्तु!

अगर हम नफरत को मिटा सके तो ही ज्ञान के वारिस कहलायेंगे |

•| ॐ |•

हो आप प्रभु के लाडले
या हो स्वयं प्रभु ?
सब चुनौतियां उन्होंने
कर ली है काबू!

करती है बहुत प्रेम आप से माता
कह दी हैं उन्होंने आपकी व्यथा

हंस कर बोले प्रभु, हॉं जानते हैं हम
वह भी समझे सम है खुशी और गम

व्याकुलता से पूछे माता
आपकी और क्या चाह?
क्यों देखने लगाते हो
और अब राह ?

अब उत्सुक हैं मेरे नयन
संदेसा ले जा रे तू पवन

हे देवि,कर्म की ही है यह गति
अब सब्र कैसा विमल हुई है मति !

जाग गया हैं अब धर्म
पलटेंगे सबके कर्म
धर्मो रक्षति रक्षित:
मानना होगा मेरा कहा!

संपूर्ण समर्पण

वृंदा आशय

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


डॉ. आनंद नाडकर्णी सरांना वृंदा दाभोळकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली

श्रद्धांजली ही कायम दुःखदायकच असते परंतु वाचनात आलेली ही श्रद्धांजली आपल्याला नक्कीच विचार करायला लावते…

डॉक्टर आनंद नाडकर्णी.. आज अनंताच्या प्रवासला निघाले..
त्यांनी 2 वर्षांपूर्वी एक session वसंत विहार च्या सप्तसोपान केंद्रात घेतलं होतं…. जस ते अनेक विषय सहज बोलून जायचे, अनेक स्फूर्तीदायक वाक्य त्यांच्याकडून उमलून यायची त्यापैकी एक म्हणजे माणूस समजून घेताना संवेदना आणि सहवेदना या दोघांशी मैत्री केली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात…
आज याच दोन शब्दांचा आधार घेत आपल्याला श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करते आहे.. सर 🙏

संवेदना आणि सहवेदना…
शब्द जरी दोन असले तरी त्यांच्यातला प्रवास मात्र दोन टोकांच्या नदीसारखा असतो.
एक नदी स्वतःच्या वेदनेतून वाहते… आणि दुसरी दुसऱ्याच्या डोळ्यांतलं पाणी स्वतःच्या ओंजळीत साठवत पुढे सरकत राहते.जे आपण कायमचं केलं सर….

संवेदना म्हणजे स्वतःच्या मनातला स्पर्श… आणि सहवेदना म्हणजे दुसऱ्याच्या जखमेवर स्वतःच्या श्वासाची फुंकर घालण्याची सहज प्रवृत्ती.
कित्येकदा असं वाटतं…
माणूस मोठा होतो तो वयाने नाही, अनुभवांनीही नाही…
तो मोठा होतो जेव्हा कुणाच्या न बोललेल्या शांततेतलं दु:ख त्याला ऐकू येऊ लागतं.
एखाद्या संध्याकाळी,
भर रस्त्यावरून चालताना अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडावं…
आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावाव्यात…
तिथे संवेदना जन्म घेते.
पण त्याच वेळी
शेजारी चालणाऱ्या माणसाने न विचारता आपल्या हातावर हलकासा हात ठेवावा…
“ठीक आहेस ना?” एवढंच डोळ्यांनी विचारावं…
आणि त्या एका स्पर्शाने आतलं वादळ शांत व्हावं…
तिथे सहवेदना उमलते.

संवेदना ही मनाची कविता आणि सहवेदना म्हणजे त्या कवितेला लाभलेला स्वर.
जगात सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे
आपल्याला समजून घेणारा माणूस.
कारण समजून घेणं म्हणजे फक्त शब्द ऐकणं नसतं…
ते तर नजरेत लपलेला थकवा वाचणं असतं.
ओठांवरचं हसू खरं आहे की जखमेवर टाकलेलं पांघरूण आहे… हे ओळखणं असतं.
आजकाल माणसं खूप बोलतात…आणि ऐकणारे कान हरवत चाललेत.
प्रत्येक जण स्वतःच्या वेदनांचं प्रदर्शन मांडून बसलाय…
पण दुसऱ्याच्या वेदनेपाशी शांत बसून राहण्याची ताकद कुणाकडे उरली आहे?
पूर्वी घरात एखादी व्यक्ती शांत बसली की आई, आजी लगेच विचारायची,
“काय झालं रे?”
आणि त्या चार शब्दांत एवढी ऊब असायची की अर्धं दु:ख तिथेच विरघळून जायचं.
आता मात्र
मोबाईलच्या पडद्यावर हजारो “Take care” चमकत असतात…
पण खरंच काळजी घेणारा हात फार क्वचित भेटतो.
सहवेदना म्हणजे कुणाला सल्ले देणं नाही…
तर काही क्षण त्याच्या अंधारात स्वतःचा दिवा घेऊन उभं राहणं.
किती विलक्षण असतं ना…
आपल्या आयुष्यात काही माणसं अशी येतात,
ज्यांच्याजवळ बसलं की स्वतःच्या जखमांनाही सुगंध यायला लागतो.
ते फार मोठमोठ्या गोष्टी बोलत नाहीत…
पण त्यांचं शांत असणंसुद्धा आधार देऊन जातं.
जसं…

सहवेदना ही अशीच असते.
एखाद्या वृद्ध वडिलांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवावा…
आणि काहीही न बोलता “मी आहे” हे जाणवावं…
एखाद्या मित्राने गर्दीत फक्त खांद्यावर हात ठेवावा…
आणि जगाशी लढण्याची हिंमत परत यावी…
एखाद्या प्रिय व्यक्तीने रडताना डोळे न पुसता फक्त रडू द्यावं…
कारण काही वेदनांना सावरण्यापेक्षा वाहून जाणं गरजेचं असतं…
हीच तर सहवेदना.
आज माणसांकडे वेळ कमी नाही…
कमी आहे ती मनाची ओल.
लोकं घरं मोठी बांधतायत …
पण मनातल्या खिडक्या मात्र लहान होत चालल्या आहेत.
संवेदना नसलेलं मन म्हणजे
पाण्याशिवाय नदी.
आणि सहवेदना नसलेलं नातं म्हणजे
सुगंध हरवलेलं फूल.
कधी कधी वाटतं…
देवाने माणसाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी बुद्धी नाही तर
दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःचं हृदय विरघळवण्याची क्षमता.
कारण ज्याला दुसऱ्याच्या डोळ्यांतलं पाणी दिसतं…
तो कधीच पूर्णपणे वाईट माणूस होऊ शकत नाही.
आयुष्याच्या प्रवासात
आपण खूप गोष्टी मिळवतो…
नाव, पैसा, प्रसिद्धी, टाळ्या…
पण शेवटी आठवणीत राहतात ती माणसं
ज्यांनी आपल्या कठीण काळात शब्दांपेक्षा जास्त साथ दिली.

माणूस खरंतर प्रेमापेक्षा सहवेदनांनी जास्त जिवंत राहतो.
कारण प्रेम कधी कधी स्वार्थी असू शकतं…
पण सहवेदना नेहमी निस्वार्थ असते.
ती कुणावर हक्क सांगत नाही…
आणि त्याच्या वेदनेला एकटं पडू देत नाही.

किती सुंदर असतील ते दिवस…
जेव्हा माणसं पुन्हा एकमेकांना “समजून” घ्यायला लागतील.
जेव्हा संवाद फक्त शब्दांमध्ये नाही तर शांततेतही होईल.
जेव्हा एखाद्याचं हसू पाहून त्यामागचं दु:खही दिसेल…
आणि एखाद्याचं रडणं पाहून त्याला सावरायला हात पुढे होतील.
त्या दिवशी
संवेदना आणि सहवेदना
खरंच हातात हात घालून चालताना दिसतील…
आणि मग
माणसांच्या गर्दीतही
मनं एकाकी राहणार नाहीत.

आज या मन मोडलेल्या समाजात डॉक्टर अजून अनंत काळ तुम्ही हवे होतात.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

©️®️वृंदा दाभोलकर


•| ॐ |•

शब्दवेध

‘दमवणारे ऊन’ आणि ‘रमवणारी ऊब’

‘ऊन’ आणि ‘ऊब’ हे दोन शब्द असे विशेषणांसह मनात आले तेव्हा मलाही त्यांचं कौतुकच वाटलं. त्यांच्याकडे मी जरासं कुतूहलानंच पाहू लागले. आजची सकाळ होतीच तशी. उन्हामुळे जीव इतका थकला की एरवी गार पाण्याने आंघोळ करणारी मी आज जरा कोमट, कोमट (उबदारपणाची जाणीव देणारं) पाणी अंगावर घेतलं. तात्पुरतं बरं वाटलं. नंतर देवाला फुलं वाहतानाही त्याला म्हणलं, “बाबा रे, नंतर. नाही कोणी वाहिली तर मी वाहेल हो.” ( माझ्या या बोलण्यामुळे चिरंजीव असे काही माझ्याकडे पाहत होते की जणू काही मी देवाला उन्हात उभं केलं आहे.)


‘ऊन’ आणि ‘ऊब’ या दोन शब्दांचा विचार करताना माझ्या लक्षात आलं या दोन्हींच्या मागे जे तत्त्व आहे ते एकच, ते म्हणजे ‘उष्णता’. उन्हामध्ये ती प्रत्यक्ष सूर्याची उष्णता असते तर उबेमध्ये लाकडाच्या शेकोटीची, मेंढीच्या लोकरीची आणि तत्सम काही गोष्टींची ‘ऊब’दायक उष्णता असते. सूर्याचं कोवळं ऊन आपल्याला केवळ हवंसच वाटतं असं नाही, तर तो पोषणासाठीचा एक अत्यावश्यक घटक आहे. मात्र थोड्याच वेळात हेच ऊन आपल्याला चटके देणारं वाटायला लागतं. ऋतू कोणता आहे आणि आपली तब्येत कशी आहे यावर ते ‘हवीशी ऊब’ की ‘नकोसं ऊन’ या वर्गवारीत मोडतं. हा विचार मनामध्ये आला आणि मला हे दोन्ही शब्द सुखदुःखाचे समानार्थी शब्द वाटायला लागले.


सुखदुःख म्हणलं की मानसिकता आलीच. भौतिक पातळीवरील ‘ऊन’ आणि ‘ऊब’ हे शारीरिक आरोग्याचे तर भावनिक पातळीवर जाणवणारं ‘ऊन’ आणि ‘ऊब’ हे मानसिक आरोग्याचे निदर्शक आहे. लहान मुलांची समजूत घालताना, त्याला जे कोणी रागावलं असेल त्याचं घर ‘उन्हा’त बांधण्याची आम्ही हमी देतो. मनाची ही ऊब त्या निरागस जीवाची खरोखरच समजूत काढते.


आपल्याकडे विविध नात्यांच्या अनुषंगाने ज्या म्हणी वापरल्या जातात त्यामध्येही या दोन्ही शब्दांमागचे उष्णतेचे हे तत्त्व आपल्या लक्षात येते. उदाहरणार्थ लेक आणि सून एकाच वेळेला घरामध्ये असेल तर साधारणपणे लेकीशी अधिक प्रेमाने बोललं जातं. त्याबद्दल सुनेकडून एखादी टोमणे वजा प्रतिक्रिया आली की आपसूक कोणीतरी म्हणतं ,”…. तर तर तुला जसं काही तव्यावरच उभं केलं आहे.” , ‘….त्यांच्यातून विस्तव जात नाही’, ‘जळलं मेलं लक्षण’ असे वाक्प्रचार तर काय काय जाळत जातात हे सांगता येत नाही. ‘… लंका जले और हनुमान बाहर’ हा एक प्रकारे सांस्कृतिक वाक्प्रचार आपण कधीकधी गंमतशीर पद्धतीने देखील वापरतो. ‘आधी हाताले चटके मग मियते भाकर’ यासारखी बहिणाबाईंची कविता केवळ संसाराचं नव्हे तर जीवनाचंच गमक सांगून जाते.


‘ ऊन ऊन खिचडी साजूक तूप
अन् वेगळं राहायचं भारीच सुख’


यासारख्या काव्यपंक्ती आधुनिक जीवनशैलीवर सहज भाष्य करतात. मानसिक पातळीवरची ‘ऊब’ ही प्रेमाची, मायेची, स्नेहाची असल्याने ती वेगवेगळ्या नात्यांकडून मिळत राहते. मी मी – तू तू करणारी ही नाती जेव्हा आपलेपणाची ‘ऊब’ देतात तेव्हा माणूस त्यात नकळत रमतो. ज्याला ‘ऊन’ ठाऊक नाही त्याला कधी कधी या ‘ऊबे’चा उबग देखील येतो.


थोडक्यात काय तर बुवा ही ‘ऊन’ आणि ‘ऊब’ या मागची उष्णता आपल्या बोलण्यातून नेहमीच डोकावते. तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. सर्वसाधारणपणे आपण जे बोलतो त्यातून काहीतरी साध्य व्हावं हे अपेक्षित असतं. त्याची कोणतीच शक्यता नसेल तर त्याला आपण, ‘ …उं तिचं काय मनावर घ्यायचं ; ती आपली नेहमीच तोंडाची वाफ दवडते’ असं म्हणून उपेक्षेच्या उन्हात कोणालातरी उभं करतो. ‘अपेक्षेच्या ऊबेला उपेक्षेचे ऊन’ हा आपल्या मानवी जीवनाचा सर्वसाधारण नियम झालेला आहे. कधी कधी वाटतं थेट ओझोन पर्यंत चकरा मारून माहिती गोळा करणाऱ्या व स्वतःला ‘ज्ञान’ म्हणवून घेणाऱ्या ज्ञानानं या सभोवतीच्या ‘ऊन’ आणि ‘ऊब’ याबाबत माणसांना अधिक संवेदनशील करण्याची आवश्यकता आहे.

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


•| |•

# कृष्ण चिंतन

आज सकाळी कृष्णाने जो गुगली टाकला होता तो काही माझी पाठ सोडेना. ‘एकमेकांची काळजी घ्यायची म्हणजे एकमेकांच्या काळाला जिंकायचं.’ केवढा व्यापक अर्थ सांगितला कृष्णानं ,’काळजी घेण्याचा’ !

 आपल्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, बहिण भावांना, नवरा- बायको एकमेकांना, अन्य नातेवाईकांना आपण दिवसातून किमान आठ दहा वेळा तरी, ‘मला तुझी काळजी आहे’, ‘मला तुझी काळजी वाटते’, असं वेगवेगळ्या कारणांनी म्हणत असतो. मात्र या काळजीमध्ये कधी ‘काळाला जिंकून घेणं येतं’,असं मला तरी वाटत नाही. काळजी हा शब्द खरं म्हणजे आपल्यासाठी खूप कॅज्युअल आहे. कोणी काळजी करतो म्हणला की ‘इट्स ओके’ इतकंच म्हणून आपण पुढे निघतो. बऱ्याच वेळेला काळजी करणं हा त्या संबंधित व्यक्तीचा स्वभाव असल्यामुळे त्याला काळजी वाटते, ही वस्तुस्थिती आहे.

          कृष्णानं सांगितलेल्या अर्थाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की, कदाचित जेव्हा काळ कठीण असतो, प्रतिकूल असतो अशा वेळेला ‘काळाला जिंकून घेणं’ हे त्याला अपेक्षित असावं. आपला व्यवहार मात्र याच्याउलट असतो. सर्व काही प्रतिकूल आहे असं दिसलं की आपण त्या माणसापासून लांब पळतो. एखाद्या रस्त्याने तो माणूस जाताना दिसला तर आपण रस्ता बदलून चालायला लागतो. त्यामागे अनेक कारणं असतात. व्यक्तीपरत्वे आणि प्रसंगपरत्वे तसंच संबंधित व्यक्तींच्या नात्यांपरत्वे या कारणांचं रूप – स्वरूप बदलतं असतं.

          हे लक्षात आल्यानंतर तर मला अजूनच प्रश्न पडला. कृष्ण सांगतो त्या प्रकारची काळजी नक्की कोण घेत असेल? त्यासाठी सर्वात आधी समोर आली ती माय माऊली. आई आपल्या मुलाची-मुलीची जी काही काळजी घेत असते ती प्रतिकूल काळ असेल तर अधिकच तीव्रतेने आणि सूक्ष्म पद्धतीने (फार बारकाईने) त्या काळाला सामोरे जाते. तिच्या वात्सल्यापुढे काळ निश्चितच पराभूत होतो. आजच्या समाजातही आजूबाजूला आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात.

            पती-पत्नीच्या नात्यातून जेव्हा मी विचार करते त्यावेळेला मला थेट ‘सत्यवान’ आणि ‘सावित्री’ यांचीच आठवण येते. सावित्रीने खऱ्या अर्थाने काळाला जिंकून घेतलं होतं. माझी आजी कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीला नेहमी ‘जन्मसावित्री हो’ असा तोंड भरून आशीर्वाद देत असायची. त्या आशीर्वादामागची ऊर्जा या नात्याकडून काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे व्यक्त करणारी होती. आपल्या आजच्या काळामध्ये ‘आदर्श जोड्या’ म्हणाव्यात अशा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच जोड्या समाजामध्ये असतील. आपली कुटुंबव्यवस्था इतकी मोडकळीला आलेली आहे की शेवटी, “जोडीदार ठरवायचं किंवा ब्रह्मगाठी बांधायचं काम जर स्वर्गात होत असेल तर तिथेही आजकाल व्यवस्थित काम चालत नाही की काय?” अशा लोक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. (भाव तसा देव हे कृष्णाचं सांगणं मात्र लोक सोयीस्करपणे विसरतात.)

           मात्र आपल्या जुन्या पिढ्यांचा विचार केला तर कृष्णाची ही अपेक्षा त्यांच्या काळात पूर्ण करणारे अनेकजण आपल्याला आपसूक भेटतात.  अशा जोड्यांच्या बाबतीमध्ये ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे’ हे वाक्य, त्यामधील विचार, मूल्य आपल्याला प्रत्यक्षात साकार झालेले दिसतात. काही ठिकाणी पतिराज देखील अगदी ‘माऊली’च्या भूमिकेत जाऊन आपल्या पत्नीची काळजी घेताना दिसतात. दीर्घ काळाच्या आलेल्या तद्रूपतेने पती-पत्नीचे स्वभाव, गुणधर्म, श्रद्धा हे एकमेकांकडे आपसूक हस्तांतरित झालेले दिसतात.अर्थात तिथे खरी प्रक्रिया असते ती विलीनीकरणाची आणि आत्मसातीकरणाची.

           आणि अशा प्रकारची काळजी घेणारा तिसरा शिवाय सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आपल्या देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक. डोळ्यात तेल घालून आणि प्राणांची बाजी लावून तो देशाचं संरक्षण करतो म्हणून आपण आपल्या घरी निवांत झोपू शकतो ही वस्तुस्थिती आहे.

         याही पुढे जाऊन आपल्याला जाणवत देखील नाही पण आपले भोग भोगून आपल्याला नकळत संकटातून तारणारा असतो तो ‘सद्गुरु’. दुर्दैवाने आज अध्यात्मक्षेत्र देखील बदनाम झालेले आहे. मात्र मूळ भारतीय संस्कृतीमधलं अध्यात्मसंचित जर आपण तपासलं तर आपल्याला लक्षात येतं शतकानुशतकं याच ‘सद्गुरु’ कृपेने मानवी समाजाला तारलेले आहे. एकदा शिष्याचा स्वीकार केला की त्याचा तारणहार होणं हे गुरुचे कर्तव्यच मानले जात होते. अर्थात त्यासाठी शिष्याला देखील गुरूच्या कठोर परीक्षांना सामोरे जावे लागे. तारणहार होताना गुरु कोणतेही चमत्कार करत नव्हते तर जीवनातील हरत-हेच्या संकटात आपला शिष्य ताठ कण्याने उभा राहू शकेल अशा प्रकारचं शिक्षण देऊन त्याचं व्यक्तिमत्त्व घडवत होते. संकट हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या संकटकाळातही शिष्याची पुरेपूर परीक्षा झाल्यावरच गुरुबलाने, त्यांच्या तपोबलाने शिष्य तारला जाई. त्यासाठी शिष्याच्या मनात देखील आपल्या गुरुबाबत अविचल अशी श्रद्धा अत्यावश्यक असते. आपल्या गुरु – शिष्य परंपरेमध्ये माणसं खऱ्या अर्थानं पेरली जात होती ; त्यामुळे भारताचा  उज्ज्वल इतिहास पाहायला मिळतो.   

         आज डागाळलेलं अध्यात्मक्षेत्र, संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं शिक्षणक्षेत्र आणि जीवनावरची श्रद्धा उडालेला मानवी समाज बघितला की भौतिक प्रगती हा आपला अंतिम टप्पा असूच शकत नाही याची पूर्ण खात्री पटते. अंतर्मन विकसित झाले तरच मानवाची आंतरिक प्रगती शक्य आहे. ‘अंतर्मन विकसनापासून’ आपले अंतर कमी झाले तर मानवी समाज प्रगतीकडे वळेल आणि हे अंतर वाढत गेले तर अधोगती अटळ आहे.

कदाचित हा कृष्णाच्या सांगण्याचा अर्थ असावा.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


यावर आपले मत नोंदवा