संत साहित्याच्या ज्येष्ठ उपासक कुमुदताई गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – वृंदा आशय

चैतन्याला येथ लाभला आराम | काळानेही क्षणभर घ्यावा विश्राम | लावावे चंदन करावे वंदन |सांगे रे तो नंदनंदन !
श्रीहरिहरेश्वरार्पणमस्तु!
कुमुद ताईंचा अखेरचा आलेला संदेश –
संवेदना म्हणजे स्वतःच्या मनातला स्पर्श..आणि सहवेदना म्हणजे दुसऱ्याच्या जखमेवर स्वतःच्या श्वासाची फुंकर घालण्याची सहज प्रवृत्ती.
🪷 सुप्रभात 🪷🙏🏻🙏🏻
– आता प्रभात सुंदर कशी होईल कुमुदताई ?

•| ॐ |•
🪷 सुप्रभात 🪷
आयुष्यातील बहुतांश नाती तुटणे अचानक घडत नाही.. संवाद कमी होतो, समजून घेणं कमी होतं नंतर बोलू म्हणता म्हणता अंतर वाढत जातं.
कुमुदताई गोसावी, पुणे.
संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक
🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏻
नेहमीच्या उत्सुकतेने आज कुमुद ताईंचा काय संदेश, हे वाचण्यासाठी मी त्यांच्या क्रमांकावर गेले. तिथे मला काल रात्री आलेली खालील बातमी मिळाली –
“कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की, संतसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कुमुद गोसावी यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी (दि. २० मे) सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
मूळ छत्रपती संभाजीनगरच्या असलेल्या डॉ. गोसावी यांचा संत एकनाथ महाराजांवर विशेष अभ्यास होता. त्यांनी ३० हून अधिक ग्रंथ लिहिले असून ‘एकोबा’ आणि ‘गिरिजा’ या कादंबऱ्या विशेष गाजल्या. संतविचार आणि समाजप्रबोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान होते.”
कमळ मिटले
कुमुद ताई,
खरंच कळत नाही कुठून सुरुवात करू? तुमचं आणि माझं नातं इतकं घट्ट आहे की माझ्या वाढीमध्ये तुमच्या विचारांचं स्पष्ट आणि पारदर्शक प्रतिबिंब पडत गेलं. त्या प्रतिबिंबाला पाहून हे बिंब फुलत गेलं हे वास्तव आहे कुमुद ताई.
तुमच्या आणि आमच्या कुटुंबाचा संबंध फार जुना. जवळपास पाच-सहा दशकांचा निश्चितच. माझ्या काकांकडून आणि वडिलांकडून गोसावी कुटुंबाचं, गोसावी गुरुजींचं नाव मी नेहमीच ऐकत आलेली आहे. गोसावी गुरुजींपासून भारतीताईंपर्यंत सारेच मला नकळत परिचित होत गेले ते याच संवादामधून.
तुमची माझी प्रत्यक्ष भेट झाली ते माझ्या काकांवरचं पुस्तकाच्या संपादनाचे काम सुरू होतं तेव्हा. तुमचा एक लेख या पुस्तकात समाविष्ट आहे. अजूनही त्या दोन-तीन भेटी मला फार ऊर्जादायक वाटतात कुमुद ताई. तुमचा अभ्यास, तुमचा व्यासंग, तुमची आस्था हे सारं काही आपल्या सहज संवादातून माझ्यासमोर उलगडत जायचं. खरं म्हणजे तुमच्या घराच्या वातावरणातच एवढे आपुलकीचे तरंग असायचे की मी नकळत तुमच्याशी घट्ट घट्ट बांधली जात होते. तुमचं घर सरस्वती भुवन पासून अगदी हाकेच्या अंतरावर. त्यामुळे तुम्हाला भेटायला यायचं म्हणलं की माझं मन आधीच धावत धावत तुमच्याकडे पोहोचत होतं. मला अजूनही आठवतं कुमुद ताई, त्या काळात गोसावी काकांना अजिबातच ऐकू येत नव्हतं. तुमचा आणि त्यांचा संवाद मी जेव्हा पाहात होते तेव्हा या म्हातारपणाचं कौतुक करावं का किती अडचणी असतात म्हातारपणी म्हणून व्यथित व्हावं असा प्रश्न माझ्या मनामध्ये रेंगाळायचा.
यथावकाश आपण पुण्याला गेलात. तिथेही आपली साहित्य सेवा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होती. बदलत्या काळाशी आणि साधनांशी आपण सहजतेने जुळवून घेतलंत. त्यामुळे यू ट्युबवरून तुम्ही भेटत गेलात. तुम्ही पुण्याला गेल्यापासून आपली एकदाही प्रत्यक्ष भेट झालेली नाही. फोनवरून मात्र आपण सातत्याने संपर्कात होतो. मुख्य म्हणजे माझ्या कवितांना तुम्ही अगदी भरभरून दाद देत होतात. तुमच्यासारखी एक व्यासंगी व्यक्ती इतकी आपुलकीने , आवर्जून दाद देते म्हणल्यावर माझ्यासाठी ती केवळ प्रतिक्रिया नव्हती तर तो एक फार मोठठा आशीर्वाद होता. त्या बळावरच मी आपल्याला माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि आपण अगदी आनंदाने ती मान्य केलीत. इतक्या पटकन आपण सुव्यवस्थितपणे प्रस्तावना लिहून पाठवली की आपलं वय कधी आपल्या आड येतं आहे असं मला वाटलंच नाही. खरं म्हणजे आपलं वय कधी जाणवलंच नाही. आपल्या बोलण्यातून कायम व्यक्त व्हायचे ती आपली ज्येष्ठता, अनुभव संपन्नता, आयुष्याकडे पाहण्याची विलक्षण सकारात्मक दृष्टी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी मनाची आल्हाददायकता ; मला वाटतं अशा वृत्तीकडे म्हातारपण कधीच फिरकत नाही. उलट ते आनंदाने तुमच्याजवळ रमलं असणार.
खरं म्हणजे लौकिकदृष्ट्या विचार केला तर पती, मुलगा आणि जावई या तिघांचाही मृत्यू पहायला लागणं म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी हे संपूर्णपणे कोसळून जाणं आहे. दुःखाचा डोंगरच तुमच्यावर कोसळल्यावर तुम्ही दुःखालाही आपलंसं करून घेतलंत. जीवनाची काय ही ताकद!
कुमुद ताई, संत साहित्यानेच ही ताकद आपल्याला दिली असणार. या शाश्वताचा जो वसा आपण घेतलात त्यानं त्याचा सारा वारसा आपल्या पदरात टाकला. आपला पदर भरजरी झाला कुमुद ताई. या पदराची सावली तुम्ही आमच्यावर धरलीत. माझ्या प्रतिकूल काळाविषयी तुमचं – माझं एकदाच बोलणं झालं. तुम्ही इतकं बळ दिलंत ताई की माझं आभाळ कधीच ठेंगणं होणार नाही. तुमचे आभार कसे मानू? तुम्ही दिलेला हा वसा, वारसा म्हणून चालवणं माझं आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी मला कृष्णबळ मिळत राहावं एवढीच प्रार्थना!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा