जो मार्ग निवडे ऋत त्यास मौनात गवसे अमृत ! – वृंदा आशय – श्रीकृष्णार्पणमस्तु

•| ॐ |•
देवबोल
देव नाही दारी देव नाही घरी
नाही रे नाही उभा देव हा मंदिरी
हे देवा, तू तर वसशी चराचरी
मग जाणावे कसे तुज अंतरी?
ओळखतेसना मर्म राख हाच धर्म
माझी खरी ओळख फक्त तुझे कर्म
कोणास टळले कर्म ते करतात सारे
मग तरीही का तुझे न्याय होतात न्यारे?
कर्मास हवा भाव शुद्ध हवी एक रीत
प्रदूषित अस्ताव्यस्ततेत का लाभेल प्रीत
ऐक माझे, जगण्यास हवी आतली दिशा
आपणच आपला तयार करावा नकाशा
नि:शंकतेने उतरावे आत खोल खोल
आपसूकच ऐकू येतात मग देवबोल !
ऐकताच ते मनी येतो प्रश्न मी कोण?
उत्तर देते त्याला समंजस ते अंतर्मोन
पटता ओळख स्वतःची ओळखावे जग
लाभे देवसंग कळतात आत्मतत्त्वाचे रंग !
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

थेंब अमृताचे – भाग १, २, ३
सार्थ अमृतानुभव या ग्रंथावरील विशेष लेखमाला
https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/05/blog-post.html
https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/05/blog-post_19.html
https://vrunda-deshpande-joshi-prasangik.blogspot.com/2026/05/blog-post_21.html

एका अनामिकाची भावलेली कविता
कोण रक्षितो गर्भामधे…?
कोण पुरवितो तेथे वारा…?
कोण निर्मितो बाळासाठी
जन्माआधीच अमृत धारा…
कोण छेडीतो श्वासांमधे…?
प्रभूस्मरणाच्या मंजूळ तारा,
कोण निर्मितो नाद अनाहत…..?
ज्याने उजळे मन – गाभारा.
उजळविण्याला मन-गाभारा
कोण चेतवी अंतरज्योती…?
करण्या निशिदिन स्मरण प्रभूचे
कोण देतसे अखंड स्फुर्ती…?
कोण घडवितो वटवृक्षाला..?
कणा येवढ्या बिजामधूनी,
कोण देतसे फळांस गोडी..?
जीवन शोषून मातीमधूनी.
कोकिळ कंठी कोणी दिधले..?
गंधर्वांचे अपूर्व देणे,
वसंत येता आम्रतरूवर
कोण फुलवितो त्याचे गाणे..?
कुणी रेखिले मोरपिसावरी..?
रंग रेशमी इंद्रधनुचे,
मेघ बरसता गर्द वनामधे
कोण नाचतो त्याच्या संगे..?
निद्रेतूनही नयनांमधे
स्वप्न होऊनी कोण जागतो..?
सुखदु:खामधे हृदयी राहून
कोण अखंडीत सोबत करतो..?
कोण..? कसे..? या प्रश्नापाठी
आयुष्याची संध्या होते,
शरण जाता श्री सदगुरूशी
मग कर्त्याची ओळख होते.
“कर्ता एक रघुनंदन” हे
शरणांगत होताच उमगते,
प्रश्न मनीचे विरून जाती
एक तत्व हे मनी प्रगटते.
गुरूकृपेच्या ऋणातुनी या
कोण कसे होईल उतराई,
हात मस्तकी सदैव वत्सल
जैसा ठेवत असते आई….
अनामिक

संदेश वागेश्वरीचा !
वाणी असो अशी लाघवी
वठल्या झाडा फुटो पालवी
सामर्थ्य वाणीचे तू जाण
तो आहे गं रामबाण !
वाणीने स्थापावे ऋत
व्हावे अमृताचे दूत
वाणीने वदावे सत्य
त्यजावे सारे मर्त्य
मधुर असावी वाणी
गावी चैतन्याची गाणी
वाणी असो व्रतस्थ
होवो साऱ्यांची हृदयस्थ !
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु !
यावर आपले मत नोंदवा