सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी जर आपण बदलली नाही तर तिची ‘कृपा’, ‘कोपा’त कधी बदलेल याचा काही नेम नाही !
जैवविविधता दिनाच्या निमित्ताने विशेष पृष्ठ – संपादक वृंदा आशय
‘शिव-शक्ति’ चे अवतरण हेच सृष्टीचे संतुलन !

•| ॐ |•
पुरूषोत्तम मास कृष्ण संदेश
माणूस दु:खातून जितक्या चटकन बाहेर पडतो तितक्या पटकन त्याला सुखातूनही बाहेर पडता आलेच पाहिजे; कारण सुख आणि दुःख दोन्हीही बुडबुड्यासमान आहेत.
श्रीकृष्णार्पणमस्तु!

मंतरलेली पहाट _ दि. १८ मे २०२६
आज पहाटे नेहमीप्रमाणे ३.३० वा. जाग आली. अर्धवट झोपेतून पूर्ण जागे होण्याआधीच मनामध्ये देव विचार निनादत होते. त्यामुळे प्रसन्न जाग आली. नेहमीच्या श्लोकांची मनात उजळणी झाली. त्यानंतर हातात आला तो एकदम कृष्णाने टाकलेला गुगली विचार. तो अगदी स्पष्ट म्हणाला –
“एकमेकांची काळजी घेणे म्हणजे एकमेकांच्या काळाला जिंकून घेणे.”
एवढे बोलून कृष्ण गप्प बसला. त्याच्या या वक्तव्यानंतर माझ्याकडे मात्र काळजी, चिंता, चिंतन सारेच धावत आले. एवढा फौजफाटा पाहून मी बावरून गेले आणि सरळ माऊली ज्ञानदेवांना शरण गेले. ‘सार्थ अमृतानुभव’ हातात घेतला आणि वाचू लागले. कालच्या संस्कृत पंचश्लोकातील पुढचे तीन श्लोक वाचून मगच माझे मन विसावले. ‘शिव’ आणि ‘शक्ती’ यांचे स्वरूप व्यक्त करत त्यांचे अभिन्नत्व व्यक्त करणारे हे विवेचन केवळ थक्क करणारे आहे. (कृष्णाची ‘तू अमृतानुभव वाच’ हे सांगण्याची ही पद्धत मलाही भावून गेली.)
तोवर ५.३० वाजले होते. पहाटेच फिरायला जायचे या कल्पनेने मन अजूनच प्रफुल्लित झाले. पाय-या उतरून खाली उतरते तो आकाशस्थ कृष्ण स्वागताला तयार. लिंबाच्या झाडाखालून त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करताना तो हसून विचारत होता, ‘काय कळले का शिवशक्ती ऐक्य?’ मी त्याच्याकडे पाहून गोड हसले. त्यातच त्याला माझ्या आकलनशक्तीचा अंदाज आला असणार.
कृष्ण असा अंतर्बाह्य भेटल्यावर माझी गती आपसूकच वाढली. मी झपाट्याने, कदाचित झपाटल्यासारखी चालू लागले. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला मला थांबवले ते पूर्ण बहरलेल्या ‘बहावा’ने. ते पिवळंधम्मक सोनं पाहून मी तर थिजल्यासारखीच झाले. मला जागं केलं ते बहाव्याभोवतीच्या असंख्य भुंग्यांनी. ते मनोहर दृश्य मला सृष्टीच्या प्रेमात पाडणारेच होते. आजपर्यंत मी फार फार तर दोन भुंगे एकावेळी पाहिलेले आहेत. त्यामुळे एकावेळी एवढे भुंगे पाहणे म्हणजे माझ्यासाठी तरी, ‘अगा मी ब्रह्म पाहिले’, अशीच अवस्था होती. माझ्या या अवस्थेमुळे माझा कॅमेराच शहाणा झाला आणि त्याने पटापट बहाव्याचे आणि भुंग्यांचेही फोटो काढून दिले. पुरूषोत्तम मासाचा मंत्र ऐकत हे जे सारं काही घडत होतं ते माझ्यासाठी अननभूत आनंद देणारे होते. त्वरित लेखणी हाती घेण्याचा मोह होत होता. मात्र मनाला दटावत सांगितले, “आधी रोजचा व्यायाम पूर्ण करायचा आणि मगच लिहायचं.”
मन लावून बागेत रोजचा व्यायाम केला. मागे वळून पाहताना जाणवलं माझ्या या छोट्याशा संयमाचे कौतुक करण्यासाठी सूर्याने आपली किरणे ढगाढगातून पाठवली होती. त्याचे आभार मानत मी म्हणाले –
उगवून येण्याआधी
भेटतोस ढगाढगातून
आणि टाकतोस
जीव माझा वेडावून!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
AI Overview
जागतिक जैवविविधता दिन (International Day for Biological Diversity) दरवर्षी २२ मे रोजी साजरा केला जातो. जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे, तिचे रक्षण करणे आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या ऱ्हासाविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
जैवविविधता म्हणजे काय?
– जैवविविधता (Biodiversity) म्हणजे पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील विविधता होय. यामध्ये सूक्ष्मजीवांपासून ते अगदी विशालकाय प्राणी, वनस्पती आणि विविध परिसंस्थांचा समावेश होतो. जैवविविधतेचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात:
१. जनुकीय विविधता (Genetic Diversity): एकाच प्रजातीमधील सजीवांच्या जनुकांमध्ये (Genes) असलेली विविधता.
२. जाती विविधता (Species Diversity): वेगवेगळ्या सजीव प्रजातींची संख्या आणि त्यांचे प्रमाण.
३. परिसंस्था विविधता (Ecosystem Diversity): जंगल, वाळवंट, महासागर, आणि गवताळ प्रदेश अशा विविध परिसंस्था आणि त्यांचे जाळे.
जागतिक जैवविविधता दिनाचा इतिहास
- सुरुवात: संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) २००० मध्ये २२ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ म्हणून घोषित केला.
- ऐतिहासिक पार्श्वभूमी: २२ मे १९९२ रोजी नैरोबी येथे जैवविविधता कराराचा (Convention on Biological Diversity) मजकूर स्वीकारण्यात आला. या कराराच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला.
जैवविविधतेचे महत्त्व
- अन्न आणि औषधे: मानवाला लागणारे अन्न, फळे, भाज्या, तसेच अनेक आयुर्वेदिक आणि आधुनिक औषधे जैवविविधतेमुळेच उपलब्ध होतात.
- पर्यावरणीय समतोल: ऑक्सिजनची निर्मिती, कार्बन डायऑक्साइडचे शोषण, हवामानाचे नियंत्रण आणि जलचक्र सुरळीत चालण्यासाठी विविध वनस्पती आणि प्राणी आवश्यक असतात.
- नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण: घनदाट जंगले आणि पाणथळ जागा पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करतात.
आपली जबाबदारी
सध्याच्या काळात प्रदूषण, जंगलतोड, आणि अतिवापरामुळे अनेक सजीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हा समतोल राखण्यासाठी आपण वृक्षारोपण करणे, पाणी व ऊर्जा वाचवणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे आणि वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे.
जैवविविधतेच्या अधिकृत संवर्धनाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण संयुक्त राष्ट्र किंवा मराठी विश्वकोश या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊ शकता.

निसर्ग धर्माचे पालन : जपूया निसर्गभान…
डॉ. शुभदा राठी लोहिया
एम. डी. मेडिसीन, पर्यावरण स्नेही
९४२२७४४८४४
त्यादिवशी एका कन्येची दवाखान्यात भेट झाली. तिला चांगली नोकरी होती. आजारी असल्याने दाखवायला आली होती. सहज गप्पा मारल्या. १५-१६ लाखाचे वार्षिक उत्पन्न असलेली ही कन्या अनेक छोट्या छोट्या तक्रारींनी त्रस्त होती. तसे पाहता तिला फारसे काही झालेले नव्हते. परंतु अतिव्यस्तते मुळे त्रास होत होता. झोप पुरेशी होत नव्हती. दिवसभर ऑफिस केल्यानंतर पुन्हा कोणता तरी कोर्स करत होती. ऑफिस व स्वयंपाक करून कोर्सचा अभ्यास सांभाळणे यात थकून चालली होती. मला प्रश्न पडला की इतकी चांगली नोकरी असताना ही कोर्स कशाचा व का करते आहे? आधी वाटले नोकरीसाठी अनिवार्य असेल म्हणून. मी तिला त्याबद्दल विचारले. तिने सांगितले, “हा कोर्स झाला की यापेक्षा चांगली नोकरी मिळेल व माझा पगार वाढेल.”
ऐकून थोडे आश्चर्य वाटले. खरेतर तिच्या इतक्या लहान वयात चांगल्या पगाराची नोकरी होती. न राहवून मी पुढचा प्रश्न विचारला, “काय करणार एवढे पैसे कमवून?”
“एक मोठे घर घेणार, ५० लाखांची गाडी घेणार.” अगदी सहज मिळालेले उत्तर.
मला प्रश्न पडला, ‘त्याच्या नंतर?’
“अजून एक घर घेणार आईबाबांसाठी.” तिच्याकडे यादी तयार होती. कितीतरी ऐहिक सुखाच्या अपेक्षा तिच्या या यादीत होत्या. मी पर्यावरणात काम करणारी एक नागरिक. मला थोडे अस्वस्थ झाले. न राहवून मी विचारले, “अग, आपल्या गावातील इतकी झाडे तुटली, कधी त्याच्या जागी नवीन झाडे लावावीत असा विचार नाही आला?” तिने जरा चाचरत उत्तर दिले, “नाही.” तिच्या चाचरण्याने मला थोडे बरे वाटले. पर्यावरणाबद्दलच्या जबाबदारीची थोडी तरी जाणीव तिच्या मनात जागृत असल्याची जाणीव झाल्याने याच गप्पांना पुढे नेत मी तिला पाच वृक्षांची नावे विचारली. तर ती पटकन सांगू शकली नाही. पण आता तिला माझ्याशी गप्पा मारण्यात रस वाटत होता. हे काहीतरी वेगळे आहे व याचा गेल्या कित्येक वर्षात आपण विचारही केला नव्हता. आपल्याशी कुणी या बद्दल बोललेही नव्हते. तरीही हे महत्त्वाचे असल्याचे तिला पटत होते. मी तिला म्हटले, “अग, जर्मन लेखक हेरेमान हेसे म्हणतो ‘झाडांचे विचार देखील त्यांच्याप्रमाणेच दीर्घ पल्ल्याचे, दीर्घ श्वासाचे आणि शांत स्वभावाचे असतात.”
“बरोबर आहे ना! आपण झाडांचा विचार केला तर आपली ही विचारसरणी तशा पद्धतीची तयार होईल.” मी पुढे म्हणाले .
“किती भारी म्हटले आहे! नक्कीच माझ्या कामासोबत मी आता झाडे, पर्यावरण यांचा विचार करीन.” आता तिला जरा उत्साह आला. तिने पुढे विचारले, “आपण काय काय करायला हवे मग?”
“सुरुवात आपल्या घरापासून करू या. आपल्या घराला चारही बाजूंनी झाडे लावता येतील अशी मोकळी जागा हवी. कित्येकांना हे माहीतच नसते की घराच्या दोन्ही बाजूंनी मोकळी जागा सोडूनच घर बांधायला हवे असा नगरपालिकेचा नियम आहे. प्रत्येक घराच्या अंगणात किमान ५ मोठी झाडे लावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय बांधकाम परवाना मिळत नाही. गाव स्वच्छ, सुंदर व शुद्ध राहण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनीच आपल्या या नागरी धर्माचे उल्लंघन होत नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज काल एका घराला लागून दुसऱ्या घराची भिंत असते, त्यामुळे झाडे लावायला जागाच राहात नाही. जर घराच्या बाजूला जागा नसेल तर किमान समोर व मागच्या बाजूला तरी जागा असायलाच हवी. समोरच्या व मागच्या भागात मिळून काही मोठी झाडे, फुलझाडे, भाज्या लावाव्यात.”
ती परत उत्साहात म्हणाली, “हो, माझ्या अंगणात आहे न जागा. पण मी कधीच काही केले नाही. आता चिकू नाहीतर आंब्याचे झाड लावेन.”
“आणि हो घराला कुंपण भिंत असेल तर रस्त्याच्या कडेने एखादे मोठे झाड लाव. त्याची निगा राख.” थोडे आढे वेढे घेत ती म्हणाली, “ पण इतका वेळ कुठे मिळतो? त्याला लक्ष कोण देणार? पाणी टाकणे, जनावरांपासून सुरक्षित ठेवणे हे सगळे कसे जमेल?” मला थोडे हसू आले. पण तिला न दाखवता म्हटले, “अग, मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात किमान २- २.३० तास कसा जातो कळत नाही. त्यातलाच अर्धा तास दिलास तरी चालेल.” आता तिलाही हसू आले, “खरच की, आपला यात इतका वेळ जातो हे लक्षातही येत नाही. मी आता झाड लावून जाते. पुण्याहून आले की परत भेटीला येईन.” मी तिला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या कामाला लागले.
तीन महिन्यांनी तिची परत भेट झाली. आता तिच्या तक्रारी संपल्या होत्या. जास्त पगारासाठीची धडपड चालू असूनही निसर्गाप्रती आपले देणे लागतो याची जाण तिला आली होती. “किती छान वाटले तुम्हाला भेटून. मी कालच पुण्याहून आले. अंगणात लावलेली झाडे छान आहेत. रस्त्याच्या कडेने दोन झाडे लावली होती. त्यातील एक करंज लावले आणि दुसरा कडुलिंब. कडूलिंबाने हवा शुद्ध राहील आणि करंज बारमाही हिरवा राहील. आणि मुख्य म्हणजे सावली होईल.” मला तिला फक्त झाडांची नावेच कळली नव्हती तर त्याबद्दल तिने माहिती देखील काढली होती याचा आनंद झाला.
“पण एक अडचण झाली आहे. कोणीतरी झाडाला आलेला शेंडाच तोडला कडूलिंबाचा. असे कसे कळत नाही लोकांना.” मी म्हटले, “हो ना. आपण नागरिक शास्त्रात मानवी हक्क शिकतो. पण समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या शिकत नाहीत. मला तर वाटते, आता नागरिकशास्त्रातच झाडे तोडू नयेत, त्यांना त्रास देऊ नये, झाडांना त्रास झाला तर अप्रत्यक्षरीत्या आपण पक्षी, झाडावरील विविध जैविक घटकांना व प्राण्यांना देखील हानी पोहोचवितो. पर्यावरण संवर्धन विषयक नागरी धर्माबाबतच्या नियामांचाही नागरिक शास्त्रात समावेश व्हायला हवा.” “खरे आहे मॅडम, पुस्तक बदलेल तेव्हा बदलेल. मी माझे काम सुरु करते ” असे म्हणत तिने अनेकांना या बद्दल जागरूक करण्यास सुरुवात केली. त्यांचा एक गट तयार झाला.
एक दिवस या गटाशी संवाद साधण्यासाठी तिने मला बोलावले. अनेक तरुण मुले-मुली झाडे लावणे, पक्ष्यांना पाणी ठेवणे, लावलेल्या झाडांना तीन वर्ष पाणी घालून संवर्धन करणे असे अनेक उपक्रम राबवत होते. गप्पा-गोष्टीच्या या उपक्रमात शासकीय घडामोडींवरही चर्चा होत होत्या.
एक जण म्हणाला, “परवा आमच्या कॉलनीत एक रस्ता नव्याने केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेची वड, पिंपळ, चिंच आणि बकूळ अशी एकूण पाच मोठ-मोठी झाडे तोडली. मला सांगा, आता मी पंचवीस झाडे लावली तरी त्यांची बरोबरी कशी होईल? ही मोठी झाडे जितका प्राणवायू देत होते तितका प्राणवायू नक्कीच ही छोटी झाडे देऊ शकणार नाहीत.” “त्यातली काही वाचवता येण्यासारखी होती का?” “हो, होती की! तीन झाडे तर रस्त्याच्या अधे मध्ये पण येत नव्हती.”
“मग का तोडली?”
त्याने सांगितले, “एक झाड कुणाच्या तरी दारात होते, त्यांना ते नको होते. आमचे घर झाकले चालले असे म्हणत होते. झाडे तोडणाऱ्या कंत्राटदारालाही तेच हवे होते. एकाच्या घरात त्यामुळे दमटपणा येतो म्हणून झाड नको होते, तिसरा म्हणाला लोक आमच्या दारासमोर गाड्या लावतात म्हणून नको.”
यावर ती कन्या म्हणाली, “मला तर वाटते या सगळ्यांना परत एकदा शाळेत पाठवायला हवे. झाडांचे महत्त्व शिकवायला हवे. ही झाडे जपणे हे आपले कर्तव्य आहे, आपली श्रीमंती आहे इतकी साधी गोष्ट कशी कळत नाही यांना!”
मला तिचे बोलणे ऐकून आश्चर्ययुक्त आनंद झाला. या मुलांशी संवाद साधला तर ही मुले किती छान काम करू शकतील याची प्रचिती आली. पर्यावरणाच्या नागरी धर्माचे पालन शिक्षणातच आणले तर रस्ते बांधताना ही मुले आधुनिक तंत्रज्ञानाने झाडांचे प्रतिरोपण करून पुनर्वसन करतील. किमान एका झाडाची पाच झाडांनी भरपाई करतील. नाली, रस्ते, यांची कामे करताना झाडे वाचवण्यासाठी मनातून प्रयत्न करतील. विजेचे खांब व लाईन, नळाची लाईन कुठून कशी जाते, याचे एकमेकांशी समन्वय करून काम होईल. असे झाल्यास झाडे वाचतील. तसेच झाडे लावण्यासाठी योग्य जागा मिळेल.
त्यांच्यापैकीच अजून एक कार्यकर्ता हळूच म्हणाला, “शेळी पालन करणारी मुले शेळ्या चरायला आणतात. नव्याने लावलेल्या झाडांचे शेंडे शेळ्या खातात त्यामुळे झाडे खुरटी राहतात. शेळ्या चरायला कसा नकार द्यायचा?”
“अगदी खरे आहे. झाडे लहान असे पर्यंत शेळ्यांपासून त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. शेळ्यांना मोठ्या झाडांचा पाला तोडून चारा द्यावा. या लहान झाडांना कुंपण लावावे.” दुसरी एक कन्या म्हणाली, “झाडांमुळे जमिनीची धूप थांबते. हवेतील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हवेतील कार्बन डायोक्साइड चे प्रमाण कमी होते. आपल्याला सावली मिळते. अन्न मिळते. कपड्याचा धागा बनविण्यास देखील काही झाडांचा उपयोग होतो. म्हणूनच झाडे ही माणसासाठी वंदनीय आहेत.” “आपल्या मंदिराच्या परिसरात त्यामुळेच पिंपळ, वड, बेल, आवळा अशा झाडांना पूज्यस्थान दिले आहे. वनस्पतींपासून औषधे मिळतात.” ही मुले व मुली आता बरीच बदलली होती. त्यांच्या लेखी आता फक्त पैसा महत्त्वाचा नसून पर्यावरण अग्रस्थानी बनले होते.
चर्चा संपताना कन्या म्हणाली, “ तुमच्यामुळे निसर्गसंपदा कळली. खरी श्रीमंती कशाला म्हणायचे ते कळले. त्यामुळेच आम्ही मुलांनी आता ठरवले आहे की रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणार. झाड म्हणजे जणू अनेक जीवांचा कैवारी होय. कितीतरी जैवविविधता त्यावर वसते. बाबा म्हणतात तसे त्यांच्या लहानपणी जसे होते त्याप्रमाणे रस्ते सुंदर बनवायचे. रस्त्यावर छान सावली व्हायला हवी. आम्ही पर्यावरण नागरी धर्माचे पालन करणार. जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेणार व याबद्दल जागरूक करणार!”
बात समय समय की !
Wise or Otherwise!
आज पहाटे फिरायला गेले. पण नेहमीसारखी मौज आली नाही, उलट काही नकारात्मक ऊर्जा जाणवल्या. तेंव्हा आपसूकच तोंडातून निघाले – बात समय समय की ! खरं म्हणजे ‘समय’ हा शब्द उच्चारला की ‘महाभारत’ ही मालिका आणि ‘मैं समय हूं’ असा धीर गंभीर आवाज मनामध्ये आपसूकरीत्या घुमायला लागतो. त्याबरोबरच काना मनामध्ये वाजायला लागतं ते थोरामोठ्यांनी सदोदीत सांगितलेलं एक वाक्य –
‘वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता|’
समय, वक्त, वेळ असा कोणत्याही भाषेमधला शब्द वापरला तरी ‘काळा’चे संदर्भ ‘भाषा आणि संस्कृती निरपेक्ष’ सर्वत्र समान असल्याचे मानवी जीवनामध्ये आपल्याला प्रत्ययाला येते. याचं कारण काय असा विचार करताना मला स्वतःला वाटतं मनुष्य हा शेवटी सृष्टीचा एक घटक आहे.
No doubt man is The masterpiece of God. प्रभावी नेतृत्वाने आणि मानवी कर्तृत्वाने ते वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. एकूणच जेव्हा या जगाच्या इतिहासाचा मी विचार करते तेव्हा मला जाणवतं, ‘To rotate clockwise and anti clock wise is the rule of this world.’ सदैव सैनिका पुढेच जायचे ही सर्वसाधारणपणे माणसाची भूमिका असते. ही भूमिका स्वीकारताना आणि अमलात आणताना त्याला सभोवतीच्या सृष्टीची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी त्याला काही संकेत मिळत राहतात, सचेत केलं जातं , मात्र याकडे दुर्लक्ष करून माणूस जेव्हा आपली वाटचाल सुरूच ठेवतो त्या वेळेला सृष्टी त्याला आठवण देते, “बाबारे ! तू माझा घटक आहेस याचा विसर पडू देऊ नको. तुझे किती अपराध मी पोटात घालू बरं?” या सहनशील सृष्टीची सहनशीलता जेव्हा संपुष्टात येते म्हणजेच तिची ‘लय’ बिघडते तेव्हा ‘प्रलय’ होत असतो. या प्रलयाची रूपं निरनिराळी असतात. कुठे उत्तराखंड सारखं प्रकरण घडतं, कुठे त्सुनामी येते , कुठे कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ‘कोरोना’ सारखा आजार येतो तर कधी ‘इबोला’ आपल्याला जागं करायला पाहतो. ‘भीती हीच स्थिती’ असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा जीवनाची क्षणभंगुरता माणसाच्या लक्षात येते. सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी जर आपण बदलली नाही तर तिची ‘कृपा’, ‘कोपा’त कधी बदलेल याचा काही नेम नाही.
हा नेम सुटू नये यासाठी माणूस काही नियम बनवतो. त्या नियमांचं मन लावून पालन करतो. काही गोष्टी नियमात बसतात , काही गोष्टी बसवल्या जातात. उन्नीस – बीस हा फरक सर्वसाधारण आहे, व्यवहार्य आहे. मात्र या फरकाचा विचार न करता जेव्हा अनेक गोष्टी माणूस बसवण्याच्या नादात कोंबण्याचा प्रयत्न करतो ; क्षमतेपेक्षा अधिक ओझं लादतो, समतेची उपेक्षा करतो तेव्हा घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झालेली असते. हे परिवर्तन स्वीकारायचे का नाकारायचे यातच माणसाचं शहाणपण वसलेले आहे. It is a matter of wise or otherwise.
सृष्टीस दृष्टी समर्पित !
•| ॐ |•
शब्दवेध

गुंता, गुंतणेआणि गुंतवणे
आज पहाटे फिरायला गेले होते. हेडफोन एकमेकांमध्ये गुंतलेले होते. त्यामुळे रेडिओ सुरू होण्यास बराच वेळ लागला. तेवढ्या वेळात वरील तीन शब्द माझ्या मनात हजेरी लावून गेले. रूपसाधर्म्य व्यक्त करणा-या या शब्दांचे अर्थ मात्र फार निरनिराळे आहेत. ते एकमेकांमध्ये गुंतून गुंता होऊ नये म्हणून मी त्यांना एकेक करून जवळ घेतले.
‘गुंता’ हा शब्द त्याच्या अर्थछटांसह दैनंदिन जीवनात आपण अनुभवतो. केसात निर्माण होणाऱ्या गुंत्यापासून आपल्या दिवसाची सुरुवात होते. केसांना तेल लावले तर हा गुंता लवकर निघतो. तसाच करकर विंचरत काढण्याचा प्रयत्न केला तर केस तुटतात, मुळापासून ओढले जातात, जास्तच त्रास होतो. केसातल्या गुंत्यापाठोपाठ गेल्या महिन्यात माझ्या लेकीच्या लोकरीच्या गुंडाळ्यांचा झालेला जो गुंता होता तोही आठवला. तो आजी – आजोबांनी अत्यंत तन्मयतेने आणि भरपूर वेळ देऊन सोडवला. त्यावरून माझ्या लक्षात आलं गुंता सोडवायचा असेल तर संयम लागतो, अनुभव असावा लागतो, ज्याच्यासाठी करायचं त्याच्यासाठी आस्था असावी लागते. शेवटी नातवंड म्हणजे ‘दुधावरची साय’ हे काही खोटं नाही. या प्रसंगाचा मी जेव्हा जेव्हा विचार करते तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात येतं गुंत्यात गुंतून, गुंता सोडवून धारण केलेली ‘अलिप्तता’ या नात्यात फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे भावनांचा गुंता निर्माण होत नाही ; कारण कधी कधी देव आला तरी भावनांचा गुंता सुटू शकत नाही म्हणून शेवटी माणसंच देवाकडे निघून जातात.
खरंच ‘गुंतणं’ इतकं कठीण आहे का आणि का आहे? या ठिकाणी अगदी स्वाभाविकरीत्या मी फक्त ‘भावनिकरित्या गुंतण्या’चा विचार करत आहे. अशा वेळेस आपल्यासमोर पटकन ‘प्रेमी युगुल’ येतं. मला मात्र त्यांचा विचार करण्याची खरोखरच आवश्यकता वाटत नाही. याचं कारण त्यांचं गुंतणं हे वयाला साजेस असतं, नैसर्गिक असतं.
हे वय ओलांडून जिथे आपली भावनिक गुंतवणूक होते ते सर्वसाधारणपणे आपलं कुटुंब असतं. ही भावनिक गुंतवणूक काही नाते फुलवते तर काही नाते कोमेजून टाकते. असं का घडावं? तिथे या गुंत्यातून हळूच थोडा वेळ पाय बाहेर काढून विचार केला की लक्षात येतं या गुंत्याची मेख असते ‘अपेक्षा’! मी त्याच्यासाठी – तिच्यासाठी, त्यांच्यासाठी असं केलं ना, मग तिने – त्याने, त्यांनी नको का असं करायला ? ही अपेक्षेची गाठ पडली की गुंता सुरू. यापेक्षा मला वाटले म्हणून मी केले, इतरांना वाटले तर ते करतील नाही तर नाही करणार ; इतक्या निरामयपणे जगता येणार नाही का? ….. जगता आले तर आयुष्य सुंदर होईल हे निर्विवाद.
‘गुंतवणे’ हा तिसरा शब्द थेट अर्थशास्त्राशी नातं सांगणारा आहे. मी काय ‘इन्व्हेस्ट’ केले आणि मला त्याचे ‘रिटर्न्स’ काय मिळाले हे व्यावहारिक शहाणपण त्यात अभिप्रेत आहे. अर्थशास्त्राच्या अनुषंगाने त्यावर काही भाष्य करावे ही माझी पात्रता नाही. परंतु ‘गुंतवणे’ या शब्दाच्या अनुषंगाने मात्र काही गोष्टी मला जाणवतात. मुळातच या प्रक्रियेत जाणीवपूर्वकता आणि निर्मिती आहे. हे जे स्वतःला गुंतवून घेणं असतं त्याची कारणं निरनिराळी असतात. कोणी आवड म्हणून, छंद म्हणून, गरज म्हणून स्वतःला गुंतवून घेतं तर कोणी Be busy & be easy हे तत्त्व सांभाळत स्वतःला गुंतवून घेतं. आपण होऊन गुंतवून घेतलं की ते छान असतं. कोणीतरी आपल्याला गुंतवलं की मग त्यात अपरिहार्यता येते. अनिच्छेने आपण काम करत जातो. कामं तर होतंच राहतात पण त्यामागे यांत्रिकता येते. तिथली माणुसकी,आपुलकी हळूहळू संपुष्टात येत जाते. कदाचित ‘पाट्या टाकणं’ हा जो शब्दप्रयोग आलेला आहे तो या वृत्तीतून आलेला असावा, असं मला वाटतं.
जिथं ‘पाट्या टाकणं’ असतं तिथं व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा गुंतवणुकीचे फायदे दिसण्याऐवजी, तोटेच जास्त दिसायला लागतात. कदाचित हे तोटे लवकर दिसत नसतीलही. कारण नियमांचा बडगा, धाक – दपटशा आणि त्याच्यासमोर सगळ्यांच्या झुकणाऱ्या माना ; अगदी राजरोसपणे हीच भूमिका सुयोग्य आहे असे जाहीर करत असते. इथे मला ‘बोन्साय पद्धतीने वाढवलेलं झाड’ आणि ‘नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं झाड’ या पद्धतीतला फरक लक्षात येतो. कदाचित अनेक जणांच्या मते बोन्साय पद्धतीनं झाड लवकर वाढतं त्यामुळे या धावत्या युगात ती पद्धत वापरण्यास हरकत नसावी. कदाचित मी साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे मला ‘वाढवलेलं’ आणि ‘वाढलेलं’ यामध्ये ‘वाढलेलं’ अधिक आवडतं. कारण त्यात नैसर्गिकता असते. आपल्या कलाने रमत – गमत, आपल्या गतीने केलेली प्रगती असते. धावत पळत जाऊन खाईत कोसळण्यापेक्षा, चालत जाऊन आरामात पोहोचलेलं कधीही चांगलंच.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
भंवरे का संदेश
हे कलि,
बहुत नाजुक हो आप
किंतु न जाओ यह भूल
आप में ही है स्थित
वह कमल का फूल
जिसके खिलते ही
खिल उठेगा सारा जहां
तितलियां, भंवरे आएंगे यहां !
आपके साथ है
हमारी शुभकामना
खिलने से ना करना मना !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
यावर आपले मत नोंदवा