विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

….कृष्णदीप तेवतो मनी !

कृष्ण कणाकणात | कृष्ण क्षणाक्षणात | मग का प्रश्न कुठे कृष्ण ?

अत्र तत्र सर्वत्र केवल कृष्ण !


•| ॐ |•

फिरते मी जनी-वनी
येते कधी अंधारुनी
अशा वेळी
कृष्णदीप तेवतो मनी !

मी निवडले सत
घेतले कृष्णव्रत
तो उभा सदोदित

तो वाहतो चिंता नि
होते रुक्मिणी सीता
अखंड सांगे तो गीता

ते शिष्यत्वाचे व्रत
गुरुत्वाचे पाही सत
त्याची कृपा सदोदित

मी निवडली माझी वाट
मिळो अखंड कृष्णसाथ
मांडूनी चौरंगपाट करे थाट !

श्रीकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•

कृष्ण कृपेने शमली वासना
कृष्णच झाला माझी तृष्णा…
कृष्ण कृपेने असे हो घडते
निर्गुणातच सगुणाचे भागते!


•|ॐ|•

कृष्णस्मित !

काल सायंकाळी कृष्णानं दिवा स्वीकारला नाही आणि थेट हृदयात चर्र झालं. मनाची कशीबशी समजूत घातली. त्याचा आणि सरस्वतीचा दिवा एकच ! पहाटे उठले. ‌‌ गाईचे दूध नासले. गाईचे दूध नासण्याचा आजचा तिसरा दिवस. आता मात्र पार वैतागले.
का रे कृष्णा का रे कृष्णा
उत्तर दे तू माझ्या प्रश्ना !
मन आक्रंदन करू लागलं. थोड्यावेळ कृष्ण गप्पच बसला. मग उदास होऊन म्हणाला, “काय करू, मीच माझ्या वचनांचा दास.”
कृष्णाला उदास झालेलं पाहिलं आणि माझी भंबेरी उडाली. त्याच्या वचनाचा अर्थ काय , तो कशाचा दास आहे या कोणत्याही प्रश्नानं मनाला स्पर्श केला नाही. कृष्ण उदास झाला हेच मला स्वीकारता येण्याजोगं नव्हतं. मी रडवेली होत त्याला म्हणाले, “कृष्णा, मला तुला कोणताही प्रश्न विचारायचा नाही. काहीही जाणून घ्यायचं नाही. …… पण तू उदास होऊ नकोस गड्या. तूच असा झाला तर मी कोणाकडे जायचं? कृष्णा, तुझ्याशिवाय कोणतीच नाही रे तृष्णा.”


कृष्ण सावरला. कसंनुसं गालात हसला. मला तेवढं पुरेसं होतं.” ….. हं आता बघा बरं कसा छान दिसतो माझा कृष्ण!” त्याच्या हास्याची ती पुसटशी रेष पकडत मी म्हणाले. तेवढीच संधी साधून त्याच्याशी संवाद वाढवला.
कृष्णा, काल तू दिवा स्वीकारला नाहीस आणि चंद्रही धुरकट दिसला रे. माझं मन बावरून गेलं बघ.
कृष्ण म्हणाला, “अगं तीन दिवस दिवा न स्वीकारलेल्या सरस्वतीच्या दिव्यातलं सगळं तेल तू माझ्या दिव्यात ओतून टाकलंस. सरस्वतीच्या या मूक समर्पणाला मी माझा प्रकाशच देऊन टाकला तर बिघडलं कुठं?”


आहा रे कृष्णा, तूच तिचं आकाश आहेस. ती तुझा प्रकाश काढून घेईल तर जाईल कुठे? आकाश अंधारलेलं ठेवून मिणमिणत राहण्यात तिला कसलाही रस नसेल बघ. … कृष्ण काही म्हणणार, एवढ्यात मीच त्याला संत ज्ञानदेवांचा दाखला देत सांगितलं, “हे बघ, संत ज्ञानदेव सांगतात शिवशक्ती एकच आहेत. मात्र त्यांच्या द्वैताभासामुळे सृष्टीचा विलास होतो. ‌… आणि ही सृष्टी फुलली नाही तर तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेत मला कसं भटकता येईल बरं? कृष्ण कौतुकाने माझ्याकडे पाहात होता. तेवढीच संधी साधून मी त्याच्याकडे हट्ट धरला, “आता आज दिवा स्वीकारायचा म्हणजे स्वीकारायचा बरं का.” मला मूक वचन देणा-या कृष्णस्मितात मी तल्लीन झाले.

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!



•| ॐ |•

प्रिय कृष्णा,

तूच माझे आकाश | तूच माझा प्रकाश
तूच माझा आकार | तूच माझा निराकार
तूच करशी जीवन |आणि मृत्यूही साकार

                           संपूर्ण समर्पण!

जयाचेनि कृपातुषारें | परतलें अविद्येचें मोहिरें |
परिणमे अपारें | बोधामृतें ||२-१४|| (अमृतानुभव)

अर्थ – सद्गुरूच्या कृपातुषारांमुळे अविद्येचे मोहरे – सैन्य वापस जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे अपार असा बोधामृत मिळतो.

श्री ज्ञानेश्वर महाराज यापुढे गुरूच्या कृपाप्रसादाबद्दल विस्तारपूर्वक लिहितात. ते म्हणतात की, गुरूची कृपा एखाद्या कारज्यांच्या तुषाराप्रमाणे असते आणि अशा या कृपातुषारामध्ये तो शिष्य बोधामृत प्राप्त करतो. अविद्येची सर्व सेना पळून जाते. ‘अविद्येची सेना’ असे म्हटलेले आहे. कारण अविद्या ही एकटी येत नाही. तिच्यासोबत अनेक विकार जसे लोभ, मोह, क्रोध, काम, मद, मत्सर आदी असतातच! अविद्या ही पंचक्लेषांतील एक क्लेष आहे व इतर चार क्लेषांची जननी आहे. जसे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे अविद्येतूनच उत्पन्न होतात.

त्यामुळे गुरूची कृपा बरसते आणि अविद्या माघारी जाते, तेव्हा ही सर्व सेनादेखील गायब होऊन जाते. अविद्या नसताना ज्ञान आणि विज्ञान बहरत येते आणि हे वैश्विक ज्ञान साधकाला अमर्त्य बनवून जाते. या विज्ञानामुळे चित्तवृत्ती शांत होऊन जातात आणि आपल्या शरीराचा सतत बदलणारा स्वभाव लक्षात येतो. आत्म्याचा स्थिर, अनादी अनंत स्वभाव समजून चुकतो आणि साधकाच्या लक्षात येते की, मृत्यू हा जीवनाच्या प्रवाहामधला एक स्वल्पविराम आहे. जीवनमुक्त दशेत असा सिध्द आपल्या इच्छेनुसार जन्म घेऊ शकतो आणि आपल्या इच्छेनुसारच पृथ्वीवर येऊन निहित कर्म करतो.

श्रीगुरुस्तवनम । ५१

संदर्भ –
श्रीमद् अमृतानुभव – आध्यात्मिक व वैज्ञानिक गूढार्थ विवेचन – डॉ. योगेश्वरी भट

श्रीकृष्णार्पणमस्तु !


यावर आपले मत नोंदवा