
•| ॐ |•
श्री मॉं!
हे प्रियतमा परमेश्वरा,
सूर्याच्या आधारे फुललेले हे फूल
सूर्याच्या अभावी
स्वतःच्या क्षमता विसरून
एवढेच फुलू शकते
तेव्हा नकोसा वाटतो मला
निसर्गातला परस्परावलंबित्वाचा सिद्धांत!
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
•| ॐ |•

काय मागावे परि म्या आणि तू ही काय द्यावे ?
श्री मॉं!
देवा, तुला घालता साद
नच मिळे साधा प्रतिसाद
कोणत्या देवाचे
आता गाऊ रे गाणे
अन् कोणत्या देवाला
करू तुझे गाऱ्हाणे?
पाहता फुले पाने
मन होते अलवार
अन् पाहता फुलपाखरू
फारच होते हळुवार !
नाते फुलपाखरांशी !
जवळपास गेल्या वर्षभरापासून फुलपाखरांशी माझं एक वेगळंच नातं जडलेलं आहे. उडणारं फुलपाखरू, बसणारं फुलपाखरू आणि कोणत्याही वस्तूचा फुलपाखरासारखा होणारा आकार हे सारंच काही मला लोभवतं ! इतकं की फुलपाखराचं शब्दश्रवण आणि प्रत्यक्ष दर्शन माझ्या मनाला फुलासारखं सुगंधी आणि पाखरासारखं स्वच्छंदी करतं!
घराच्या गॅलरीमध्ये बसल्यानंतर सभोवतीच्या परिसरामध्ये स्वच्छंदपणाने उडणारी फुलपाखरं न्याहाळत राहणं हा माझा छंद. ती कदाचित निर्हेतुकपणे उडत असतील किंवा त्यांच्या उडण्यामागे काही नैसर्गिक कारण असेलही. त्यांच्या त्या उडण्यावर, दिसण्यावर आणि असण्यावर मी मात्र बिनधास्तपणे माझ्या आनंदाचा हेतू ठसवून आणि मनात साठवून त्यांच्यासारखीच रंगीबेरंगी होऊन जाते. मध्यंतरी आम्ही काही कारणाने भाड्याच्या घरात राहत होतो तेव्हा चहाच्या वेळेला समोरच्या लिंबाच्या झाडाभोवती भिरभिरणारी फुलपाखरं माझं फार मनोरंजन करायची. ती कोणत्या रंगाची, किती उंचीवरून उडतात, कसे भिरभिरतात यावर माझे फार ठोकताळे ठरायचे. कधी कधी वाटतं त्या नाजूकशा पंखांना एवढं ओझं पेलवेल तरी का? माझ्या मनातलं त्यांना काहीच कळत नाही म्हणून देवाचे मी मनस्वी आभार मानले.
माझ्या अंगणामध्ये चाफा, कर्दळी, बेल, सायली, गुलाब, कमळ अशी नाना तऱ्हेची, नाना रंगांची फुलझाडे आणि पानझाडे आहेत. काळया रंगाचं, हिरव्या ठिपक्यांचं फुलपाखरू जेव्हा बेलाभोवती हव्या तेवढ्या प्रदक्षिणा घालतं आणि क्षणभर सायलीवर विसावतं, तेव्हा माझा जीव मोहरून येतो. चॉकलेटी रंगाचं, काळया कडांचं इवलंसं 🦋 कर्दळीभोवती भिरभिरतं तेव्हा माझा जीव सुखावतो. पिवळ्या रंगाचं काळया कडांचं छोटंसं फुलपाखरू उन्हामध्ये आनंदाने नाचत सुटतं तेव्हा कदाचित माझ्या इतकंच कौतुकाने ☀️ ही त्याला पाहात असावा. ते माझं वेडं बाळ जेव्हा कमळाभोवती सुखावतं, तेव्हा माझं निर्लेप मातृत्व कमळाच्या पानावरच्या दवबिंदूत हसतं.
एकदा सगळे रंग असलेल्या एका माझ्या लाडक्या फुलपाखराला निरोप देण्याचीही वेळ माझ्यावर आली होती. अधून मधून किंवा खास करून माझ्या सुखदुःखाच्या विशेष क्षणांमध्ये जे फुलपाखरू माझं साथीदार असल्यासारखं अवचित प्रकटायचं, त्याचा सायलीच्या जवळ गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये यथासांग अंत्यविधी मी अत्यंत संयत मनाने केला होता. त्यानंतर एकांतात फुटलेला बांधही मनसोक्त वाहू दिला होता. माझ्या दुःखावर फुंकर घालणाऱ्या मातेने आणि माझ्या कृष्णाने माझ्या त्या क्षणांना सावरलं होतं. दोनच दिवसांनी पुन्हा तसंच फुलपाखरू माझ्यासाठी पाठवलं होतं. त्याला पाहताच माझी कळी खुलली. त्या सुखदुःखाच्या झाडात मीच माझी होऊन विसावली!

संपूर्ण समर्पण मॉं!

•| ॐ |•
श्री मॉं!
कशी होऊ मी तुझी
उतराई रे आकाशा
दाखविशी तू मज
क्षणाक्षणाचा नकाशा
तेथ होता राजहंस
पकडू पाहता क्षणी
सांग कोण मारे डंख
अन् रूप बदले झणी !
….. पण हळवा भाव नाही आता मनी!
देवा,
सांग ना मज घडविले असे रे कोणी?
संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!
प्रतिक्रिया व्यक्त करा