विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

सृष्टीच्या सान्निध्यात स्वागत प्रसन्नतेचे !

लेखन व संपादन _ वृंदा आशय

•| ॐ |•

श्री मॉं!

शब्दचांदणे

शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा

म्हणालीस, “चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !”

कवी यशवंत देव यांच्या गीतातील वरील ओळींनी मला ‘या’ गीतावर काही लिहावं याला भाग पाडलं असं म्हणलं तर ते चुकीचं ठरू नये. कारण कालपासून हे गीत माझ्या मनामध्ये घर करून आहे. अगदी कोणत्याही अवचित क्षणी,

“म्हणालीस तू, चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा”

असं हे शब्दचांदणं माझ्या ओठी धावत येतं. हे पुन्हा पुन्हा येऊन पोटी पचत गेलं आणि त्यातून जे काही अंकुरलं ते इथे तुमच्यासमोर आहे.

या गीताबद्दल माझ्याही नकळत मी विचार करायला लागले कारण अरुण दाते यांचे सूर मनामध्ये रेंगाळतच राहिले. बकुळ म्हणलं की सगळ्यात आधी आठवलं लहानपणीच गाणं –


या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया !

कित्येक पिढ्या ही कविता शिकत, म्हणत मोठ्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्या फुलाचा सुगंध पिढ्यापिढ्यांमधून दरवळत राहतो. ‘या बाई या’ असेल किंवा ‘ये रे ये रे पावसा असेल’, पावसामध्ये भिजलेल्या ‘चिमणी आणि कावळ्याची गोष्ट’ असेल; हे सारे साहित्य मानवी मनाचा एक नाजूक संवेदनशील धागा फार चिवटपणाने आणि लवचिकतेने पुढे घेऊन आलेले आहेत. असो.

लहानपणी बकुळीच्या झाडाखाली वेचली गेलेली फुले हळूहळू आपल्या सोबत नकळत मोठी होतात. युवा अवस्थेमध्ये एक वेगळीच धुंदी ते देऊन जातात. (खरं म्हणजे बकुळीचं झाड प्रत्यक्षात मी पाहिलेले असे मला तरी आठवत नाही. मात्र या कवितांमधून गाण्यांमधून ते माझ्या भोवती दरवळत राहिलं.) आम्ही शाळेमध्ये असताना माझी एक जवळची – गोड गळ्याची मैत्रीण म्हणजे जयश्री ठाकूर. ती माझ्या भावाच्या मित्राची बहीण. त्यामुळे आमची मैत्री अधिकच घट्ट. शाळेमध्ये ती नेहमी ‘दिल्या घेतल्या वचनांची’ हे गाणं म्हणत असे. कदाचित तिच्यामुळे हे गाणं मनावर अधिक ठसलं असावं.

आत्ता परवापासून विनाकारणच मला या गीताची आठवण येत होती. त्यामुळे हे गीत, त्याचे काही तपशील मी शोधले. का ते सांगता येणार नाही मात्र बकुळीच्या आणि जुईच्या फुलांचे वैशिष्ट्य काय, त्यांचा अधिकचा अर्थ काय हे उगाचच शोधावं वाटलं. त्यातून ‘बकुळ वृक्षाची माहिती’ हा you tube वरील आणि फेसबुकवर ‘जाई आणि जुई’ या फुलांमधला फरक सांगणारा, असे दोन चांगले व्हिडिओ माझ्या बघण्यामध्ये आले.

बकुळीच्या फुलाचं मोहक असणं, त्याचं जमिनीकडे झुकणं, दीर्घकाळ सुगंधी राहणं या त्याच्या गुणांनी माझ्या लेखणीला मोह घातला. तर जाई – जुई मधला फरक ऐकताना त्याच्या ‘त्रिदल’ पानांनी माझ्या मनाला फुलवलं. त्यामुळे नकळतच मी या फुलांना, या गाण्याला कुठेतरी लिहिण्याचं वचन देऊन गेले, त्याची ही पूर्तता.

हे गीत जेव्हा मी पुन्हा पुन्हा ऐकते त्या वेळेला ते एक ‘निखळ प्रेमगीत’ आहे हे प्रकर्षाने जाणवते. या गीतामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीला ज्या पद्धतीने त्यांच्यातील नाजूक, अबोल, संवेदनशील अशा काही क्षणांची आठवण देत आहे ; तिची मनधरणी करत आहे. मला वाटते प्रेमामध्ये प्रियकराने प्रेयसीची केलेली अशी मनधरणी क्वचितच कुठे पाहायला मिळेल.

आयुष्याच्या वाटेवर कदाचित एखाद्या हळव्या क्षणी ते एकमेकांना प्रेमाची वचनं देऊन बसलेले आहेत आणि व्यवहारी जगामध्ये प्रेमाबाबतचा अनुभव पाहिला तर ‘शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है’ ; ‘हम न समझे थे ये बात इतनी सी ख्वाब शीशे के और दुनिया पत्थर की’ अशा प्रकारची अनेकविध कारणांमुळे अवस्था असते. स्थल काल व्यक्ती यानुसार कारणं बदलत जातात, थोड्याफार फरकाने मात्र सर्वत्र हीच परिस्थिती पाहायला मिळते.

कदाचित आजचा मैत्री आणि विवाहामधला ट्रेंड लक्षात घेतला तर माझे वरील विधान हे जुन्या काळाशी नाते सांगणारे आहे असे अनेकांना वाटू शकते. मला मात्र असे काही वाटत नाही. याचं कारण आज-काल लोक प्रेमामध्ये खऱ्या अर्थाने पडतात. वास्तविक प्रेमाचा अर्थ ज्याला कळतो तो स्वतः तर उभा राहतोच राहतो, मात्र उभयतांच्या या प्रेमाच्या ताकदीने एक साम्राज्य उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही, इतकी मोठी ताकद प्रेमामध्ये असते. त्या दृष्टीने आजच्या प्रेमी जीवांचा विचार केला तर ते बऱ्यापैकी भ्रमनिरास झालेले जीव असेच पाहायला मिळतात. ते परेशान आणि त्यांच्यामुळे आजूबाजूचे परेशान अशी ही परेशानी वाढवणारी प्रेमकहाणी होते. असो.

वरील गीतामध्ये ज्या वेळेला दिल्या घेतल्या वचनांची ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी एकमेकांना शपथ घातली जाते त्या वेळेला पहिली आठवण कशाची आहे तर ‘मनातल्या या मोरपिसांची’ शपथ तुला आहे.

मोर आणि मोरपीस बघून आनंद होण्यासाठी वयाचं किंवा स्थळ काळाच बंधन निश्चितच नाही. मोरपिसामधील मोहकता, नजाकत, अलवारपण, त्यातील निळे जांभळे रंग, त्याचा आकार आणि मोराने फुलवलेला पिसारा पाहिला तर ‘स्वर्ग दोन बोटे शिल्लक राहिला आहे’, अशी होणारी मनाची अवस्था! सर्वसाधारण माणसाची ही स्थिती होते तर प्रेमात पडलेल्या जीवांची स्थिती काय होत असेल हे सांगणे न लगे.

या प्रेमी जीवाच्या भेटीगाठी कुठे झालेल्या आहेत तर त्या रात्रीच्या वेळी बकुळीच्या झाडाखाली, त्यामुळे निळ्या चांदण्यांमध्ये हे धुंद करणारे सुगंधी क्षण परस्परांना परस्परांच्या हृदयाची ओळख करून देतात. ते आयुष्याचे अत्तरक्षण होतात.

जिथे प्रेमी जीव असतात तिथे ‘चंद्र आणि चांदणं’ नसेल तरच नवल! कधी ते आकाशातलं असतं तर कधी ‘गडे उन्हाचे गोड चांदणे’ असं मनातलं नेहमीच असतं. प्रियकराशी गप्पा मारता मारता प्रेयसीने नाजूक साजूक अशा जुईच्या फुलांचा केलेला चंद्र आणि काळया जमिनीवरती ती पांढरीशुभ्र फुले बघत ‘चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा’ ही कवीने वापरलेली प्रतिमा अफलातूनच. खरं म्हणजे ही फुलं इतकी नाजूक असतात की त्यांना हात लावला तर स्पर्श सहन होईल की नाही असा प्रश्न पडतो परंतु प्रेयसीने त्यातून कधीतरी रेखाटलेला चंद्र प्रियकराला शपथ घालण्याचं बळ देतो.

सोनेरी उन्हामध्ये पाऊस पडत असला म्हणजे ते दृश्य आपल्याला अनेक विवाहांची आठवण देते. प्राणी जगतातल्या कोल्हाकोल्हीच्या लग्नाची जशी आठवण येते त्याहूनही अधिक ‘बालकवींच्या फुलराणी’ची आठवण येते. अशा स्वप्नभारीत सोनेरी उन्हामध्ये भुरभुरत्या पावसात मखमली गवतावरून चालताना, वाट चुकल्याची कबुली आणि चुकलेल्या वाटेची शपथ घालण्याची प्रियकराची अटकळ मोठीच सुंदर आहे.

हे प्रेम यशस्वी झालं की नाही कुणास ठाऊक? मात्र ‘हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी’ ‘तुझे भास दाटून येती असे अंतरंगी’ हे कवितेतले उल्लेख प्रियकराचे कातरमन, जर हो म्हणण्यासाठी प्रेयसीने दीर्घकाळ घेतलेला असेल तर त्याचे वाढते वय आणि त्या वयाबरोबर वाढत जाणारी विषण्णता ‘उदास आभाळ’ या प्रतिमेतून मार्मिकपणे व्यक्त होते.

इथले प्रियकर प्रेयसी कोणी एक व्यक्ती नसून ती रसिक मनाची एक प्रेमप्रवृत्ती आहे. हे ज्याला कळतं तो या गाण्याचा केवळ आस्वादच घेत नाही तर त्यातली रुखरुख त्याच्याही मनाला हळवं करून जाते. व्यक्तिगत जीवनात ‘उन्हात चांदणे’ भासले तरी या कवितेतील ‘चंदेरी-सोनेरी ऊन’ अरुण दाते यांच्या स्वरसुरांनी रसिक मनाला हात घालत राहते.


•| ॐ |•

श्री मॉं!

पाहता दोन पानातली कळी
मज आठवते
राम शास्त्र्यांची भिकबाळी!

स्वये या शब्दाचा एक अर्थ
मान – सन्मान
अन् दुजा उघडतो विनंतीचे पान!
पाहता शास्त्रांचे संदर्भ
रामशास्त्री होऊन येतात
आशयगर्भ!
जातात सहजच सांगून
ऱ्हस्व-दीर्घासह शब्दाचे व्याकरण!

विद्वत्ता नव्हे पूज्य अकारण 
        कोणत्याही स्थळी-काळी!

संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामकृष्णार्पणमस्तु!


•| ॐ |•
चाफ्याच्या दांडी मागे
लपते पांढरे फूल
होऊन गोंडस मूल

अन्

चाफ्याच्या पानात
हसते कर्दळीचे फूल !
श्रीकृष्णार्पणमस्तु!

|| ॐ ||

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||

|| ॐ गं गणपतये नम: ||

सुपारीचे घडता दर्शन
मज दिसतो गजानन |
जेथ दर्शन देती त्रिमूर्ती
तेथ मज दत्तगुरु दिसती ||

वृंदा आशय

🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏


प्रतिक्रिया व्यक्त करा