विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

भवसिंधूतून तारते ती गुरुकृपाच !

आपण विचार पेरतो त्यातून कृती उगवते,

कृती पेरतो त्यातून चारित्र्य उगवते

आणि

आपण चारित्र्य पेरतो त्यातून नियती उगवते !

•| ॐ |•

देवा ,

तुम्ही एक अपार शांती
तुम्ही एक मूक क्रांती

टेकताच येथे माथा
हृदयी पसरे अथांगता
झुकवता येथे शीश
मिळतो चैतन्याशीष

संपूर्ण समर्पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु!



https://www.facebook.com/share/p/1RkPppy7Rh

गुरुपौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो… तुम्हाला माहिती आहे का? सृष्टीचा कालचक्र हा गुरुपौर्णिमेला सुरू होतो ते? आणि कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? गुरु नेमके कोण आहेत? त्यांची सुरुवात कुठून झाली?

देव उठनी एकादशी आणि देवशयनी एकादशी ( योगनिद्रेत ) हे का महत्त्वाचे आहे. आणि ह्या अवस्था घडण्या पाठीमागे काय कारण आहे? ते

माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेला एक सूक्ष्म आध्यात्मिक दृष्टिकोन आहे.”

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसून, संपूर्ण सृष्टी, मन आणि जीवनाच्या निर्मितीचा एक टप्पा आहे. माझ्या चिंतनानुसार या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून होते. निर्गुण म्हणजे परब्रह्म. जिथे कोणताही आकार नाही, कोणतंही नाव नाही, पण सर्व काही अस्तित्वात येण्याची अनंत शक्यता आहे.

या निर्गुणातून सर्वप्रथम जे प्रकट होतं, ते म्हणजे गुप्त रूप. आणि माझ्या अनुभूतीनुसार हेच गुप्त रूप म्हणजे गुरुतत्त्व. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण सृष्टीला दिशा देणारं पहिलं तत्त्व (परब्रह्म) . म्हणूनच गुरुपौर्णिमा ही केवळ गुरुंच्या पूजनाची तिथी नाही, तर निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वाच्या स्मरणाची आणि कृतज्ञतेची पर्वणी आहे.

आता हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा, आपल्या हातात एक फुगा आहे. फुगा स्वतःहून फुगत नाही. कोणीतरी त्यामध्ये श्वास भरतो. पण फुग्याकडे पाहणाऱ्याला तो श्वास दिसत नाही. त्याला फक्त फुगा दिसतो. प्रत्यक्षात मात्र फुग्याला आकार देणारं कार्य अदृश्यपणे आतून चालू असतं.

माझ्या अनुभूतीनुसार गुरुतत्त्वाचं कार्यही असंच असतं. ते गुप्त रूपाने प्रत्येक जीवामध्ये प्रेरणा निर्माण करत राहतं. आपण अनेकदा स्वतः विचार करतोय असं वाटतं; पण प्रत्यक्षात आपण इतरांना पाहूनच प्रेरित होत असतो. एखाद्याने नवीन गाडी घेतली, तर आपल्या मनात ही तशीच इच्छा निर्माण होते. एखाद्याने घर बांधलं, तर आपण ही तसंच स्वप्न पाहू लागतो. एखादा साधक साधनेत पुढे गेला, तर आपल्या ही मनात साधना करण्याची प्रेरणा निर्माण होते. हा प्रेरणेचा अदृश्य प्रवाह म्हणजेच माझ्या चिंतनानुसार गुरुतत्त्वाचं गुप्त कार्य आहे.

या गुप्त प्रेरणेनंतर गणेशतत्त्व प्रकट होतं, ते साक्षीभाव स्वरूपात. कारण कोणत्याही निर्मितीपूर्वी बुद्धी आणि विवेक आवश्यक असतो. त्यानंतर विष्णुतत्त्व जीवधारणेचा प्रवाह सांभाळतं. ब्रह्मतत्त्व निर्मिती घडवतं. महेशतत्त्व आवश्यक परिवर्तन आणि विसर्जन घडवतं. शक्ती तत्त्व (आधी माया नवरात्र उत्सव ) या संपूर्ण प्रवाहाला कार्यरूप देते. पुढे सप्तऋषी, विशेषतः महर्षी अत्री आणि माता अनसूया, या ज्ञान आणि पावित्र्याच्या संगमातून या प्रवासाला पूर्णत्वाकडे नेतात.

त्यानंतर पुन्हा काळ पुढे सरकतो. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागृत होतात ( राम जन्म दिवाळी ) . माझ्या चिंतनानुसार, जे सूक्ष्म स्वरूपात घडत होतं, ते आता नव्या प्रकट कार्यासाठी सज्ज होतं. जसा गर्भातील जीव योग्य काळानंतर प्रकट होतो, तसाच हा विश्वप्रवाह ही सतत सूक्ष्म आणि प्रकट अशा दोन अवस्थांमध्ये फिरत राहतो.

या सूक्ष्म प्रवासात सर्वप्रथम गुरुतत्त्व दिशा देतं. त्यानंतर क्रमाने विविध दैवी तत्त्वं कार्यरत होतात. हा प्रवास महिना न महिना पुढे सरकत राहतो. माझ्या चिंतनानुसार, हा प्रवास मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तात्रेयांच्या जन्माने पूर्णत्वाला पोहोचतो. कारण ते संपूर्ण दैवी कार्य प्रवाहाचं प्रकट स्वरूप आहेत.

पण याच मार्गशीर्ष महिन्यात श्री मल्हारी मार्तंडांचं कार्यही मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. माझ्या अनुभूतीनुसार, श्रीदत्तात्रेय हे चैतन्याला दिशा देतात म्हणजे शरीर, तर मल्हारी मार्तंड मनाला धारण ( मन धारण ) करण्याची, संयमित करण्याची आणि धर्मासाठी उभं करण्याची शिवशक्ती जागृत करतात. म्हणून माझ्या चिंतनात दत्ततत्त्व आणि मल्हारी तत्त्व हे या कालचक्राचे परिपूर्ण टप्पे आहेत.

याच कारणामुळे भारतीय सणांचं कालचक्र मला अत्यंत अर्थपूर्ण वाटतं. माझ्या चिंतनानुसार, देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंची योगनिद्रा ही निष्क्रियतेची नसून, पुन्हा नव्याने विश्वात एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू होते. जीवधारणेच्या अदृश्य प्रक्रियेचं प्रतीक आहे. जे कार्य डोळ्यांना दिसत नाही, ते सूक्ष्म पातळीवर घडत असतं. म्हणूनच या काळात बाह्य विस्तारापेक्षा अंतर्मुख होण्याला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे.

आणि हे संपूर्ण कालचक्र घडण्यामागे निसर्गही तितकाच महत्त्वाचा आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, ऋतू बदलतात, वातावरण बदलतं, आणि त्यानुसार साधनेचे, उत्सवांचे आणि अंतर्मुखतेचे काळही बदलतात. म्हणून भारतीय सण हे केवळ दिनदर्शिकेतील दिवस नाहीत; ते निसर्ग, सृष्टी आणि चेतनेच्या अखंड प्रवाहाशी जोडलेले आहेत.

म्हणून माझ्या अनुभूतीनुसार भारतीय सण वेगवेगळे नसून, ते मननिर्मिती, सृष्टीनिर्मिती आणि दत्तनिर्मिती या अखंड प्रवासाचे टप्पे आहेत.

या संपूर्ण प्रवासाची सुरुवात निर्गुणातून प्रकट झालेल्या गुरुतत्त्वापासून होते, आणि त्याचं प्रकट पूर्णत्व श्रीदत्तात्रेयांमध्ये अनुभवायला मिळतं. हेच माझ्या साधना, चिंतन आणि अनुभूतीतून मला जाणवलेलं सनातन कालचक्र आहे. 🙏🚩

|| अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त ||
॥ श्रीपादराजम् शरणं प्रपद्ये ॥ 🙏

#DattatrayaSpiritualGyan #GuruTattva #GuruPurnima #Dattatreya #SanatanDharma #SpiritualWisdom #DivineKnowledge



श्री माँ !

पूर्णयोग म्हणजे काय?

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १७

संपूर्ण ईश्वरी-साक्षात्काराचा, संपूर्ण आत्म-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे, आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणा-या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे; तर येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही; या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्म-दान करणे, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे हे अंतर्भूत आहे. आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन (superconscious) आणि अवचेतन (subconscious) घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमे झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये (illumination) आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे.

हे पूर्णयोगाचे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद

(CWSA 12 : 358)


पूर्णयोगाचे उद्दिष्ट

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १८

‘ईश्वरी’ उपस्थिती व दिव्य चैतन्यामध्ये प्रवेश करणे आणि त्याने व्यापून असणे हे ह्या योगाचे उद्दिष्ट आहे; ईश्वरावर केवळ ईश्वरासाठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ईश्वराच्या प्रकृतीशी मिळतीजुळती होणे, आणि आपल्या इच्छा, आपले कर्म, आपले जीवन हे ईश्वराचे साधन बनणे, हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा मौजमजेसाठी ईश्वराला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरी हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या, तरीपण त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. केवळ ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 21)


पूर्णयोग

पूर्णयोगातील आवश्यक पायऱ्या

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १९

आत्म्याचा साक्षात्कार आणि विश्वपुरुषाचा साक्षात्कार या आपल्या योगातील आवश्यक पायऱ्या आहेत; (विश्वपुरुषाच्या साक्षात्काराविना आत्म्याचा साक्षात्कार अपूर्ण असतो.) इतर योगांची तेथे परिसमाप्ती होते, परंतु हीच जणू आपल्या योगाची सुरुवात असते; म्हणजे हाच तो टप्पा असतो जेथे (पूर्ण)योगाच्या वैशिष्ट्यपूर्ण साक्षात्काराचा आरंभ होऊ शकतो.

– श्रीअरविंद

(CWSA 32 : 334)


पूर्णयोग

आंतरात्मिक हाक

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २१

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण या योगात ते इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक कठीण आहे आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांची कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची आणि कोणताही धोका पत्करण्याची, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही तयारी आणि क्षमता आहे, तसेच संपूर्ण नि:स्वार्थीपणा, वासनाशून्यता आणि समर्पण यांच्या दिशेने प्रगती करण्याचा ज्यांचा संकल्प आहे, त्यांच्यासाठीच हा योग आहे.

या (पूर्ण)योगामध्ये फक्त ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर, संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच दिव्य चेतनेच्या आविष्करणासाठी जोपर्यंत जीवन सक्षम होत नाही आणि ते ईश्वरी कार्याचा एक भाग बनत नाही तोपर्यंत, आंतर व बाह्य जीवनात बदल घडवीत राहणे, हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजेच, निव्वळ नैतिक आणि शारीरिक तपश्चर्येपेक्षा कितीतरी अधिक काटेकोर व अवघड अशी आंतरिक शिस्त येथे अभिप्रेत आहे. इतर अनेक योगांपेक्षा खूप विशाल व अधिक कठीण असलेल्या अशा या योगमार्गामध्ये, एखाद्याने त्याला अंतरात्म्याकडून हाक आल्याची खात्री असल्याखेरीज आणि काहीही झाले तरी अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्याची तयारी असल्याखेरीज प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद

(CWSA 29 : 27)


संपूर्ण समर्पण !

श्रीकृष्णार्पणमस्तु !



||ॐ ||

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया: |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


श्रीकृष्णार्पणमस्तु !

प्रतिक्रिया व्यक्त करा