विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्ण मैत्र

नि:संगता हा मैत्रीचा समानार्थी शब्द आहे.


•| ॐ |•

मित्र – मैत्रिणींना ‘मैत्री दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या. आपसूकच कृष्ण मनात डोकावला. त्याला मनात ठेवून काही शोधायला गेले, तर तोच भेटला, ‘मैत्री दिनाच्या’ शुभेच्छा देत !

श्रीकृष्णार्पणमस्तु!


दि. १७ .०५ .२६

•| ॐ |•

शब्दवेध

‘वाद’ आणि ‘स्वाद’

आज सकाळी बसल्या बसल्या सहजच एका वाक्याची आठवण झाली. ११वी मध्ये शिकत असताना मी जयसिंगपूर येथे एका राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेसाठी गेले होते. तिथे जगदीश अग्रवाल नावाचा एक स्पर्धक सहभागी झालेला होता. अतिशय उत्तम असं त्याचं भाषण झालं. त्याच्या भाषणामध्ये तो म्हणाला होता, “गांधीजी वादकी नाही स्वाद की चीज है|”
माझ्या त्या वेळेच्या कोवळ्या मनाला हे वाक्य खूपच भावलं. केव्हातरी प्रसंगपरत्वे ते मनामध्ये निनादत राहतं. आज मात्र कोणत्याही प्रसंगाशिवाय अगदी सहज आणि अचानक आठवलं. इतकं अचानक की मीच त्या वाक्याने जरा दचकले. स्वाभाविक मला श्रीकृष्णाची आठवण आली आणि मनातल्या मनात मी म्हणलं हे वाक्य जो म्हणाला होता त्याचं नावही ‘जगदीश’ होतं. असो.
शब्दांचा विचार करायला आपल्याला कोणतंही निमित्त पुरतं, एवढं खरं. ‘वाद’ या शब्दाचा विचार करताना सगळ्यात पहिली छटा समोर येते ती ‘मतभेदा’ची. मतभेद असल्याशिवाय ‘वाद’ संभवू शकत नाही. वेगळं मत असणं हे मतभेदाचे निदर्शक आहेच पण भांडणाचं कारण का असावं, हे कोडं मात्र मला काही उलगडत नाही. कारण लोकशाही अस्तित्वात ठेवून बळकट आणि निकोप करणारं, ‘मतभेद’ हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
खरं म्हणजे ‘वाद’ या शब्दाचा एक अर्थ ‘विचारसरणी’ असा होतो. आपण जेव्हा ‘मार्क्सवाद’, ‘गांधीवाद’ अशा संज्ञांचा वापर करतो तेव्हा त्यामध्ये हाच अर्थ अभिप्रेत असतो. ‘मतभेद’ जर एका वेगळ्या विचारसरणीच्या निर्मितीला कारणीभूत ठरत असतील, तर मला ती त्यांची विलक्षण सकारात्मक शक्ती वाटते. त्यामुळे मी तरी मतभेद असावेत, बाळगावेत आणि स्वीकारावेत या मताची आहे.
‘मतभेद’ हा शब्द आठवला की त्याच्या पाठोपाठ मला ‘मनभेद’ हा शब्द आठवतो.’मतभेद असावेत पण मनभेद नसावेत’, हे वाक्य मी माझ्या वडिलांकडून आणि सरस्वती भुवन मधील विविध शिक्षकांकडून अनेक वेळेला ऐकलेलं आहे. त्यामुळे हे दोन शब्द जोडकार्डासारखेच माझ्या मनामध्ये प्रगट होत राहतात. माझ्या वडिलांनी मला हे वाक्य समजावून सांगताना, कोर्टामधील वकिलांचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले, ” वकील हे परस्परांचे मित्र असतात. मात्र त्यांचे अशील निरनिराळे असतात. त्यामुळे स्वाभाविकरीत्या त्यांना एकमेकांच्या विरुद्ध कोर्टामध्ये उभे राहावे लागते. मात्र हे आपल्या अशीलांच्या बाजूने एकमेकांच्या विरुद्ध लढतात म्हणून त्यांची मैत्री संपते का, तर नाही. कारण त्यांना माहिती असतं ही अशीलांची केस केव्हा ना केव्हा संपणार आहे ; आपण मात्र याच ठिकाणी कार्यरत राहणार आहोत. तेव्हा अशीलांच्या निमित्ताने आपण परस्परांमध्ये भांडून काय मिळणार आहे? त्यामुळे कोर्टामधलं त्यांचं याचिकेवरचं विवेचन झालं की ते एकमेकांसोबत चहा प्यायला जाताना, जेवायला जाताना अगदी सहज दिसतात. त्यात आपण काही वावगं मानून घेण्याचं कारण नाही.
माझ्या त्या बालमनाला हा परस्पर विश्वासाचा फार मोठा दाखला वाटायचा. कारण हे वकील कोर्टात भांडतात पण कोर्ट संपलं की एकमेकांचे मित्र होतात म्हणून कधी अशीलाने वेगळी केस केलेली माझ्या तरी ऐकिवात नाही. म्हणजेच माझ्या बाजूने लढताना प्रतिपक्षाच्या वकिलाशी संवाद साधणारा हा वकील आपल्या केसशी, अशिलाशी प्रतारणा करेल असं घडत नाही ; हा विश्वास तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये होता. याला आपण एक प्रकारची विचारसरणी, एक प्रकारची श्रद्धा म्हणायला हरकत नाही.
मला वाटतं ‘वाद’ हा ‘स्वादा’मध्ये परिवर्तित होतो तो अशा ठिकाणी. एकातऱ्हेने विचार केला तर ‘वाद’ आणि ‘स्वाद’ ही दोन्हीही जिभेची कार्ये आहेत. आपण बोलताना विविध वागिंद्रियांचा वापर करतो. मात्र जीभ नसेल तर आपण बोलूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या आपल्या भोळ्या मनाला वाटतं,
“मन शुद्ध असेल तिथे वाद स्वादामध्ये परिवर्तित होतो.”

श्रीकृष्णार्पणमस्तु!


दि. ०३ /०३/२०२६

•|ॐ|•

निष्काम रंग

रंग रंगाचे रंग संगाचे
रंग मैत्रीचे रंग प्रीतीचे
रंग नीतीचे रंग गतीचे
रंग मतीचे रंग वृत्तीचे
रंग साथीचे अन् निवृत्तीचे…

संपूर्ण समर्पण!

शुभं भवतु !

                                       वृंदा आशय 

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻


•| ॐ |•

कुमुदताई तुम्हाला मैत्रीदिनाच्या मनापासून शुभेच्छा !

  • जबाबदारी घेतांना ‘मी’ आणि श्रेय घेतांना ‘आपण’ हे शब्द जर केंद्रस्थानी असतील, तर कुठलेही काम सहज निःसंशय पूर्ण होते.
  • यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात तर समाधानाची आपण स्वतः !
  • काही शब्दांचे आधार इतके भक्कम असतात की स्पर्श न करताही आपण तोल सावरू शकतो. जीवनात अडचणी कितीही असो,चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात,शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यावर त्या संपून जातात.
  • वेळ, सत्ता,संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.
  • संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात, ‘स्वाभिमान’ आणि ‘हिम्मत’!
  • माणसाला शिस्त असेल तर या संघर्षातून विजय निश्चित असतो.
  • स्वप्नं अशी बघा की पंखांना बळ येईल, मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल, माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल.
  • जिथं राग लोभ क्षणात मोकळा होतो. दुःखाचा साठलेला बांध जिथं वेगानं वाहू लागतो. असं मैत्रीचं झाड प्रत्येकानं लावावं. नात्यापलीकडचं नातं सर्वांनी जपावं.

कै. कुमुदताई गोसावी

(संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)

(हल्ली मुक्काम विठ्ठलाशेजारी)

🙏श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏


आदरणीय प्रा.समीर घोले, संस्थापक “बालतीर्थ” नसरापूर यांनी मला एक इंग्लिश पोस्ट पाठवली; मी गांभीर्याने ती वाचली आणि मराठी वाचकांसाठी तात्काळ तिचा मराठी अनुवाद केला.

माझी दयाळू वर्गमैत्रीण

✍️ अनामिक

अनुवाद: डॉ.ज्ञानेश्वर थोरात

       मी जेंव्हा तेरा वर्षाचा होतो, तेंव्हा मी एका सुप्त लाजाळूपणाला घेऊन वावरत होतो. आम्ही इतके गरीब होतो की  शाळेला जाताना आमच्यासोबत शिदोरी कधीच नसायची. मधल्या सुट्टीत माझे मित्र  दुपारच्या जीवनाच्या डब्यातील सफरचंद कापत ; बिस्किटांचे पुडे उघडून सँडविच खाण्यासाठी तयार ठेवत . मी मात्र मला भूकच लागलेली नाही; असा बहाणा करून शांत बसून असे. माझ्या रिकाम्या पोटात भुकेने ओरडणाऱ्या कावळ्यांचा आवाज दडपून मी माझा चेहरा पुस्तकात लपवत होतो. आतमध्ये किती वेदना होत्या त्या मी जशाच्या तशा स्पष्ट करून सांगू शकत नाही.

       लवकरच एके दिवशी माझ्या वर्गातील एका मुलीच्या हे लक्षात आलं. अगदी शांततेने कसलीही गडबड न करता तिने मला तिच्या  जेवणातील अर्धा डबा देऊन टाकला. मी लाजेने चूर झालो, परंतु तो मी स्वीकारला.  दुसऱ्या दिवशीही तिच्याकडून तेच घडलं आणि पुन्हा तसेच होऊ लागलं. कधी कधी ती चपातीचा रोल, कधी कधी सफरचंद, कधीकधी तिच्या आईने तव्यावर भाजलेले  केकचे काही पीस ती मला देऊ लागली. तो माझ्या जीवनातला एक विलक्षण चमत्कार होता. मला असं वाटू लागलं की खूप दीर्घकाळानंतर कुणीतरी मला पहात आहे; माझ्याकडे लक्ष देत आहे.

एके दिवशी ती एकाएकी शाळेत दिसली नाही, तिचं कुटुंब माझं गाव सोडून गेलं होतं आणि ती परत माघारी कधीच झाली नाही. दररोज दुपारच्या सुट्टीत आशाळभूतपणे, ती येईल, तिने यावं, स्मित हास्य करत सोबत सँडविच घेऊन माझ्या बाजूला बसावं ; अशी मनीषा बाळगून मी दरवाज्याकडे पाहत राही परंतु ती कधीच आली नाही.

       अजूनही तिचा दयाळू आणि स्नेहाळूपणातला चांगलपणा मी माझ्यात जागा ठेवला आहे .आता तर माझ्या व्यक्तित्त्वाचा तो एक भाग झाला आहे.वर्षांमागून वर्षे उलटून गेली.मी मोठा झालो. परंतु तिचे चिंतन सदैव होत राहिलं .आयुष्य पुढे पुढे जात होतं.

       अगदी काल असंच काहीतरी घडलं. त्याने मी जागच्या जागी गोठून गेलो. माझी धाकटी मुलगी शाळेतून घरी आली आणि लडिवाळपणे जवळ येत म्हणाली,” पिताश्री, उद्या मला दोन डबे पॅक करून द्याल का?”

” दोन?” मी विचारणा केली.” तुला तर कधी एकही संपत नाही,” तिने खूप गांभीर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, “पिताश्री, एका मुलाला एक डबा हवा आहे. तो मुलगा माझ्या वर्गातील आहे. आज तो उपाशी होता म्हणून मी माझ्या डब्यातील अर्धा डबा त्याला देऊन टाकला.”

मी तिथेच स्तब्ध झालो. अंगावर शहारे आले. जणू कालचक्र थांबलं होतं .तिच्या लहान कृतीत मला माझ्या बालपणातील माझ्या वर्गातील त्या मुलीचे दर्शन घडले होतं. दुसऱ्या कुणाच्या नजरेत येणार नाही; अशा पद्धतीने तिने मला जेऊखाऊ घातलं होतं. तिचा तो दयाळूपणा नाहीसा झाला नाही तर तो आज माझ्यातून पुढे वाटचाल करत होता आणि आता माझ्या मुलीमध्ये सुद्धा मला तो स्पष्ट दिसत होता.

       बालपणात मी पाय ठेवला आणि आकाशाकडे पाहिलं; का कोण जाणे; माझे डोळे तुडुंब भरून आले होते. एकाएकी मला माझी तत्कालीन भूक आठवली. माझा लाजाळूपणा, माझा कृतज्ञपणा आणि माझ्या तत्कालीन आनंदाच्या स्मृती आठवल्या. त्यावेळच्या माझ्या वर्गातील त्या उपकारकर्त्या मुलीने मला कदाचित लक्षात ठेवले नसेल, तिने माझ्यासाठी केलेली गोष्टही विसरून गेली असेल ,आणि त्याने तिच्यात काही फरकही पडला नसेल परंतु मी तिला कधीच विसरणार नाही कारण “एका दयाळू वृत्तीने केलेली अगदी लहानातली लहान कृती सुद्धा एक जीवन अंतर्बाह्य बदलून टाकते,” हे तिने मला शिकवलं होतं. आणि आता मला समज आली आहे की माझी मुलगी जोपर्यंत तिचा डबा दुसऱ्या गरीब मुलाला शेअर करत आहे; तोपर्यंत हा दयाळूपणा पुढेही टिकून  राहील.

(माझ्या पूर्वसंकलनातून)

****


‘सागरा प्राण तळमळला’

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या गाण्याची शताब्दी झाल्यात्यानिमित्त पुण्याचे स्वामी माधवानंद यांनी केलेले ‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे रसग्रहण.

“मोठया गौरवाने गावं असं हे गीत आपण अनेकदा ऐकलं आहे. त्याच्या शब्दांतून जी वेदना प्रगट होते ती जाणून घेऊन ते शब्द ऐकले पाहिजेत. असं झालेलं नाही, की सावरकर सहज साईट सिइंगला ब्रायटनच्या समुद्रतीरी गेले आणि एकदम त्यानां गीत स्फुरलं वेदनदेखील कशामुळे होती ती परिस्थिती कळली पाहिजे की काय घडत आलं होतं आणि काय मोडत होतं!

काय घडत होतं ?

हे सर्व ऐन तारूण्यातले मोठे उत्साही आणि बुध्दिमान देशभक्त होते. एकदा सावरकरांना लंडनमधील प्रसिध्द वृत्तपत्राच्या प्रतिनिधिने विचारलं होतं, की तुमच्यावर सतत लक्ष ठेवलं जातं, तुमच्या मागे सतत पोलिसांची नजर असते ते तुम्हाला कसं वाटतं ? त्यावर सावरकर म्हणाले, “We don’t mind. They may follow us if the atmosphere suits them !” टिपिकल ब्रिटिश विनोद म्हणून त्यांच्या या उदगाराचं कौतुक झालं होतं. India House हे कार्याचे केंद्र. तिथलं वातावरण तर अत्यंत भारलेलं होतं. हा मदनलाल धिंग्रा, सावरकर स्वतः सेनापती बापट हे सगळे त्यावेळेला रसरसते तारूण्य आणि देशप्रमाचं वारं डोक्यात घेऊन वावरणारे स्फूर्तिशील युवक होते. सेनापती बापट यांचा घातलेला वृध्दपणीचा फोटोच आम्ही नेहमी पाहत आलो आहोत. लहानपणापासून ते तसे दिसत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप एवढी पडत असे, की त्यांची एक फ्रेंच मैत्रीण जिला त्यांनी फ्रेंच भाषेतलं बॉम्बस्फोटाचं लिटरेचर ट्रान्सलेट करून द्यायची रिक्वेस्ट केली होती. तिने आपली परीक्षा बाजूला ठेवून – ड्रॉप घेऊन प्रथम ते इंग्लिशमध्ये भाषांतरित करून दिलं. त्याच्या प्रती काढून सावरकरांनी भारतातल्या क्रांतीकारकांना पाठवल्या. त्याचाच उपयोग पुढचे बॉम्बस्फोट केले गेले. लंडनमध्ये देखील ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असा मतप्रवाह होता. अनेक क्रातिकारकांचं ते कार्यस्थळ होतं. रशियन क्रांतीची सूत्रे देखील तेथूनच हलत होती. हिंदुस्थानातल्या तरूणांच्या कार्याचा प्रभाव वाढत होता.

काय मोडणार होतं ?

हे सर्व क्रांतिकार्य देशाबाहेरून चाललं होतं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणा-यांत सिंहाचा वाटा असलेल्या मॅझेनीचं आत्मचरित्र सावरकरांनी भाषांतरित करून भारतात पाठवलं होतं. त्याची सावरकरांच्या भाषेतली प्रस्तावना एवढी तेजस्वी आणि प्रेरणादायी होती, की ब्रिटिश सरकारला भीती वाटली आणि तिच्यावर बंदी आणली. अर्थातच ती जास्त प्रसिध्द झाली. सावरकरांना लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत करून लंडनला पाठवल होतं. टिळक आणि सावरकर दोघांच्या बुध्दिमत्तेबद्दल तिथे आदर होता. बॅरिस्टरची परीक्षा पास होऊन पदवी दिली न गेलेला तरूण म्हणून सावरकरांबद्दल सहानुभूती होती. याचवेळी मदनलाल धिंग्राने कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे सर्व लोकमत सावरकर आणि सहकारी यांच्या विरूध्द गेलं. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडली होती. इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची सजा दिली गेली. मदनलालच्या निषेधाला सावरकरांनी विरोध केल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर केंद्रित झाल्या. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलविण्याची शक्यता मोडून पडली. लंडनमधील कार्य उदध्वस्त होण्याची वेळ आली.

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही. त्याला उभं करायचं आणि त्याचवेळेला एकाकी झुंजायचं असं अवघड काम ते करीत होते. कुटुंबाची वाताहत, कार्य उदध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपणं आणि स्वतः शंभर टक्के पकडले जाणार आहोत हे कळणं यातून अक्षरशः पळून जाऊन ते त्या ब्रायटनच्या किना-यावर बसले होते. पकडलो गेलो तर परत भारतात पाठवतीलच असं सांगता येत नाही हा अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आणि समोर सागर. तो मध्ये आहे म्हणून जाऊ शकत नाही. या भावनेतून ते शब्द आले – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ जणू काही ते त्यांचा सगळा भावनिक आघात सागरावर करीत आहेत –

त्या सागरावर रागावलेला – रूसलेला हा मातृभूमीचा प्रियपुत्र म्हणतो – ‘सागरा, तू खरं तर माझा भूमातेचे पाय धुणारा सेवक आहेस.
भूमातेच्या चरणतला तुज धूता ।
मी नित्य पाहिला होता

त्यावेळेला मी तिथे असताना तू मला मैत्रीने म्हणालास – मित्र मित्राला म्हणतो तसा – की चल जरा फिरायला जाऊ
दुस-या देशात-
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ ।
सृष्टीची विविधता पाहू

त्याच वेळेला माझ्या आईच्या ह्रदयात माझा तिला विरह होईल की काय अशी शंका आली.
तअ जननी-ह्रद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधले

पण तू तिला वचन दिलंस, की मी मार्गज्ञ म्हणजे वाट माहित असणारा आहे, आणि मी याला अगदी पाठीवरून घेऊन जाईन – जहाज सागराच्या पृष्ठावरून म्हणजे पाठीवरूनच नेलं जातं. त्यानुसार
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन।
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी

तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. तू जगभर सगळीकडे आहेस त्यामुळे जगाचा तुला अनुभव असाणार हा विश्वास आणि मलाही जगाचा सुंदर अनुभव यावा ही इच्छा या दोन्हीच्या योगे मी ‘बनलो’ तयार झालो आणि ‘बनलो’ म्हणजे फसलो.
तव अधिक शक्त उदधरणी । मी

पाणी कोणत्याही वस्तुला उत् म्हणजे वर धारण करतं वर ढकलंत त्याला उदधरण ( buoyancy) म्हणतात. त्यामुळे वस्तूचं वजन पाण्यात कमी वाटतं. हा उदधरण. शक्तिचा शास्त्रीय अर्थ आणि ‘उद् धार करणे’ याचा प्रचलित अर्थ दोन्हींनी – तुझ्या उद् धरण शक्तीवर जास्त विश्वासलो. इथं अडकवून चांगला उद् धार केलास बरं !
‘येईन त्वरे’ कथुन सोडिले तिजला ।
सागरा प्राण तळमळला ।।१।।

लवकर येईन असं सांगून तिला सोडलं. (भारताचा किनारा सोडला) पण आता ते जमेल की नाही कुणास ठाऊक म्हणून प्राण तळमळतो आहे.
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी ।
ही फसगत झाली तैशी

पोपट पिंज-यात किंवा हरिण पारध्याच्या पाशात सापडावा तसा फसलो.
भू विरह कसा सतत साहू या पुढती ।
दशदिशा तमोमय होती

तमोमय म्हणजे अंधःकारमय – मार्ग दिसत नाही असं झालंय.
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद् धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा

मला काय आठवतं ? तर माझ्या देशातल्या आम्रवृक्षांची वत्सलता, त्या फुललेल्या सुदंर वेली आणि तिथला छोटा पण सुगंधी गुलाब. (इकडच्या मोठया गुलाबांना तो सुगंध नाही आणि इकडच्या माणसांना आमच्या कुटुंबातल्या माणसांप्रमाणे घरात ती आम्रवृक्षासारखी वत्सलता ही नाही. त्यांच्यावर पुढची पिढी नवलतांसारखी वाढते आणि तिच्या पुढच्या पिढीची फुलंही त्या वृक्षवेलींवर नांदतात. ही सुंदर कुटुंब वत्सलता – प्रेम इथे नाही.
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला ।
सागरा प्राण तळमळला ।। २ ।।
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी ।
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।
वनवास तिच्या जरि वनिंचा

राज्य तर नकोच आहे पण वनवास सुध्दा तिच्याच वनातला हवा आहे. तुरूंगात घातलं तरी भारतातल्या तुरूंगात यांनी घालावं पण एखादे वेळेस हे इथेच कुठेतरी डांबून ठेवतील, ते नको आहे.
भुलविणे व्यर्थ हे आता । रे
बहु जिवलग गमते चित्ता । रे
तुज सरित्पते, जी सरिता । रे

हे सरित्पते, म्हणजे सरितांचा पती – इथलं काव्य पाहण्यासारखं आहे. सरिता (नद्या) सागराला स्वतःचं सगळं समर्पित करतात. तो त्यांचा पती. सरितेला सागराची ओढ असते तशीच सागरालाही सरितेची ओढ असते. सागराला म्हणत आहेत -माझं जिच्यावर प्रेम आहे त्या भारतामातेचा मला विरह घडवशील तर हे सागरा तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सरितांचा तुला विरह होईल अशी मी तुला शपथ घालतो. नद्या तुझ्याकडे आल्याच नाहीत तर – मग प्राण तळमळणं म्हणजे काय असतं हे तुलाही कळेल.
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ।। ३ ।।

यानंतर आता शेवटचं कडवं आहे त्यात सावरकरांची आर्त आहे ; पण ती दीनवाणी नाही तर ती आक्रमक आर्त आहे. एखादा संकटात सापडलेला गलितगात्र सुटकेची भीक मागतो तसं हे मागणं नसून अवघड परिस्थितीतल्या सिंहाची डरकाळी आहे. सागराला सरितांच्या विरहाची शपथ घालून झाल्यावर ते सागराकडे पाहत आहेत तर त्याच्या लाटा तशाच उसळून फुटून फेसाळत आहेत. तो फेस पाहून त्या प्रकारे तो निर्दय सागर हसतो आहे असं त्यांना वाटलं. वीर पुरूषाने आव्हान दिल्यावर खलपुरूष असेच हसतात. असं वाटून ते म्हणतात-
या फेन-मिषे हससि निर्दया कैसा ।
का वचन भंगिसी ऐसा ?

माझ्या भारतमातेला तू जे वचन दिलं होतंस, की मी याला परत आणीन, ते भंग करून असा हसतोयस कसा ? हे गुलाम असतात ना, ते ज्यावेळेला मालकाच्या ताब्यात असतात तेव्हा आपण सुरक्षित आहोत म्हणून जगाकडे पाहून ते हसतात; पण ते गुलामीवृत्तीचं हीन प्रदर्शन असतं. तुझं हसणं हे असंच आहे. तुझ्यावर स्वामित्व गाजवणा-या आंग्लभूमीचा तू खरं तर गुलाम. तिला भिऊन राहणा-या सागरा,
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते ।
भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी ।
मज विवासना ते देशी

विजनवास विदेशवास किंवा विवास – तू मला देतो आहेस पण अरे, आंग्लभूमीला भिणा-या भित्र्या खलपुरूषा, ऐक –
तरि आंम्लभूमी भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे

माझी भारतभूमी ही अबला नाही आहे हे तुला एक दिवस कळेल. पूर्वीचा अगस्ति ऋषीचा प्रसंग तू विसरला आहेस.
कथिल हे अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला

आमच्यातला एक अगस्ति पू्र्वी तुझ्यावर क्रुध्द होऊन एकाच आचमनात तुझं सगळं पाणी पिऊन बसला. तुझी कुठे नाव निशाणीही राहिली नाही. सर्वांनी प्रार्थना केली म्हणून त्याने तुला सोडलं. एवढा रूबाब काय करतोयस गुलामा, अगस्तीचा वारसा लाभलेले आम्ही तुला पुन्हा धडा शिकवू.

मातृभूमीला दुरावलेला आणि कायमचा दुरावला जाईल अशी शक्यता असलेला एक वीर पुरूष सागरावर रूसलेला आहे. वेदनेतून निर्माण झालेल्या ह्या अप्रतिम काव्यातून महापुरूषाचं मातृभूमीवरचं प्रेम आणि तिच्या भेटी आड येणा-या सागरावरचा रोष प्रकट झालाय. युवा केंद्राचं आगळेपण हे आहे की सागरावरचं हे तुफानी काव्य गात आहे सागरच !


( साभार – स्वरूपयोग)
विशेष आभार- www.savarkar.org


एका अनामिकाचे – माझ्या पूर्वसंकलनातून

माझे गुरुजी,नरहर कुरुंदकर  यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त  विनम्र अभिवादन !

अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. 11 व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला.

पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10-11 वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. पण ते महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय तेव्हा बनले जेव्हा 1956 ला बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला ‘सत्यकथा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यांनंतर मुंबईच्या मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं.

गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर (आताचं बारावी) पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत शिक्षक होते.

शाळेत शिक्षक असतानाच त्यांनी प्राध्यापक पदासाठी राम शेवाळकर यांची मुलाखत घेतली होती

प्राचार्य राम शेवाळकरांनी काही काळ नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू कुरुंदकरांनी घेतला होता. जेव्हा शेवाळकरांना कळलं की, आपला इंटरव्ह्यू एक शालेय शिक्षक घेणार आहे तेव्हा ते नाराज झाले. त्यांनी कॉलेजचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे तक्रार केली. त्यावर रामानंद तीर्थ म्हणाले, यात कमीपणा काय यात तुमचा सन्मानच आहे.

इंटरव्यू सुरू झाला, कुरुंदकरांनी शेवाळकरांचा इंटरव्यू घेतला. हा इंटरव्यू सुमारे दोन तास चालला. इंटरव्यूनंतर कुरंदकरांनी त्यांची निवड केली आणि पुढे त्यांची चांगली मैत्री देखील झाली ….

गुरुजी,तुम्ही मला लेखनिक म्हणून अनेकवर्षे  लेखनाची संधी दिलीत.पी यु सी ते एम. ए. पर्यंत नव्हे तर आजही मी तुमचा विद्यार्थी राहिलो आहे, याचा मला अभिमान आहे.मराठी  विषय  शिकवत असताना अनेकप्रकारचे ज्ञान दिले, मला माझ्या   पायांवर उभं केलंत .मी आज जो काय आहे ,तो केवळ तुमच्यामुळेच आहे.

गुरुजी ,तुमचा मी कायम कृतज्ञ आहे…….

*****************

(गुरुजी मी तीन वर्षांची होते, तेंव्हा तुम्ही लौकिक दृष्ट्या या जगातून निघून गेलात. कदाचित शेवटचे भाषण तुम्ही माझ्या शिक्षणसंस्थेतच करत होतात.

        …..पण तुम्हाला माझ्या वडिलांनी माझ्या मनात असे काही पेरले की तुमचे – माझे नाते चिरंतन झाले, तुमच्या पुस्तकांमधून, विचारांमधून, खरे म्हणजे काळावर मात करून टिकणाऱ्या त्यातील चैतन्यातून ! त्या निरंतर नात्यातून आजच्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा आधी माझ्या वडिलांना आणि आता तुम्हाला !

….गुरुजी, एकच प्रार्थना तुमच्यापायी, “गुरुजींना माय – बापही होता यावे आणि मित्रत्वही निभावता यावे आपल्या विद्यार्थ्यांशी, एवढाच आशीर्वाद द्या हो !)

तुम्ही जिला कधीच प्रत्यक्ष पाहिले नाहीत अशी तुमची एक विद्यार्थिनी – वृंदा आशय


श्रीकृष्णार्पणमस्तु !

संपूर्ण समर्पण माँ!


प्रतिक्रिया व्यक्त करा