चित्त स्वातंत्र्य
संपूर्ण जीवन योग आहे .

•| ॐ |•
एक खुले पत्र भारतमातेस !
वंदे मातरम्!
प्रिय आई,
खरं म्हणजे तुला पत्र लिहिण्याचं काहीच कारण नाही. कारण तू कायम आमच्या हृदयामध्येच असतेस. मात्र ऑगस्टचा महिना आला की या आपलेपणाचे विशेष वारे वाहायला लागतात. या वाऱ्यावर अभिमानाने डौलत असतो माझ्या देशाचा ‘तिरंगा’ ! हा असा फडकता ध्वज पाहिला की ऊर कसा अभिमानाने भरून येतो ; आणि मग वाटतं मनमोकळेपणाने बोलावं फक्त तुझ्याशी!
आई, तुला ठाऊक आहे ०१ ऑगस्ट बद्दल मला काय वाटतं? ०१ ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी असते तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असते. मला वाटतं हा फक्त योगायोग नाही. हे दोघेही तेल्या तांबोळ्यांचे नेते. एकाने राजकारणाच्या निमित्ताने समाज जागवला तर एकाने समाज जागृतीच्या निमित्ताने धर्म, संस्कृती आणि राजकारणाला भान आणलं. मला वाटतं उगाचंच कोणा एकाच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांच्या कार्याच्या सुवर्णमध्य स्वीकारावा, आणि आपली पावलं ठामपणाने उचलावीत ; मग ती दोघेही सुखावतील.
आई, परवा तुझ्या चिमुकल्यांची रॅली बघितली बघ. शारदेच्या त्या छोट्या चिमण्या हातामध्ये झेंडे घेऊन आणि मनामध्ये आईला घेऊन मोठ्या उत्साहाने फिरत होत्या. सहजच विचारलं का गं कसली रॅली, एकीनं सांगितलं 'हर घर तिरंगा'! मोठं कौतुक वाटलं बघ मला तिचं. या अभियानाच्या निमित्ताने NCC, NSS जोमात कार्यक्रम घेत असतात. फक्त शाळा महाविद्यालयातच नाही तर वस्त्या वस्त्यांमध्ये ' वंदे मातरम्' चा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो.
खूप प्रेम करतात गं आई सगळे तुझ्यावर. या प्रेमातूनच तू सगळ्यांच्या हक्काची होतेस. मग कधी कोणी तुझ्यावर रागावतं, कधी स्वतःचं दुखणं – खूपणं सांगतं, कधी कोणी आपलं मागणं मागतं, कोणी हळुवारपणे, कोणी हट्टाने तर कोणी आक्रस्ताळेपणे ! तू सगळ्यांचं ऐकून घेतेस. आई आहेस ना शेवटी. तुझ्या परीने तू खूप काही आधीच दिलेलं असतं गं. मात्र एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी त्यातून जन्मते हा निसर्गाचा नियमच आहे जणू. या निसर्गधर्माला ‘यम – नियमांनी’ वाट दाखवत थेट अष्टांग योगाचा जिना पतंजली मुनींनी देऊन ठेवलेला आहेच. माणसाला फक्त चढावं लागतं सातत्याने. बाकी सगळं ते ‘योगशास्त्र’ आपोआप साधून घेतं बघ. अत्यंत मलीन चित्तापासून, पसायदानापर्यंत माणसाला पोहोचवण्याचा विडा त्यानं उचललेलाच आहे. आणि खरं सांगू का इतकं टोकाचं कोणीच नसतं गं. साधी भोळी माणसं आम्ही. कुठेतरी अधेमधे उभं असतो आपापल्या पायरीनुसार. असेल तिथून आणि असेल तसा माणूस स्वीकारते योगशास्त्र. शेवटी भारतीय संस्कृतीने अखिल जगताला दिलेली ती देणगी आहे.
तुला गंमत सांगू आई? आम्ही या योगशास्त्राला, ॐकाराने सुरू होणाऱ्या प्रार्थनेला ‘धर्मा’च्या कोंदणात अडकवायला पाहतो. खरंतर वस्तुस्थिती अशी आहे, ‘धर्म’ म्हणजे काय याचीच आमची कल्पना बऱ्याच वेळेला अस्पष्ट असते. आम्ही उगाचच गुंतागुंतीची करतो गं ती. खरंतर किती सोपं आहे,
‘कर्म सांगतो तो धर्म’. याचा मथितार्थ मात्र मोठा गंमतशीर. करायचं पण धरायचं नाही, करून सोडायचं. भारतीय संस्कृतीच्या परिभाषेमध्ये त्याला ‘प्रेम’ आणि ‘त्याग’ या दोन संज्ञांमध्ये व्यक्त केलेलं आहे. शब्दांची गंमत अशी असते बघ, या दोन संज्ञा घेऊन आम्ही ‘प्रेमाचा त्याग’ करायला भाग पाडतो. खरंतर ज्या संस्कृतीच्या मुळाशी ‘भोग’ नाहीच तिने ‘भाग’ पाडण्याचं कारण काय, हे मला कळत नाही. जेव्हा ‘प्रेमाने त्याग’ आम्हाला जमेल त्या वेळेला या संज्ञांचे खरे अर्थ लक्षात येतील.
प्रेमाने केलेला त्याग माणसाला कधीही निष्क्रियतेकडे वळवत नाही. चुकीच्या मार्गाला तर चुकूनही वळवत नाही. असं का घडतं? याचं कारण आहे मला अध्यात्मात सापडतं. अध्यात्म माणसाला आतून, त्याच्या पंचकोशातून /सप्तकोशातून ‘साधन’ म्हणून घडवतं तर विज्ञान – तंत्रज्ञान त्याला अन्य साधने देऊन सुखी करण्याचा प्रयत्न करतं. माणसाला जेव्हा ‘साधनसौख्य’ हवंहवंसं वाटतं तेव्हा त्याला ‘साधने’चा त्रास व्हायला लागतो. साधनेच्या अभावी ‘हवं’ या इच्छेचे रूपांतर ‘हाव’ मध्ये होते. ही हाव कोणालातरी हिसका देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे याचा आव आणते. हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढायला लागली की हिंसक प्रवृत्ती माणसाला हिंसेकडे नेते. ‘कायावाचामने’ जगण्याचे सूत्र देणाऱ्या भारतीय संस्कृतीला हिंसेचे वावडे आहे. तेव्हा हे बरं नव्हे, म्हणून कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर
‘तो मी नव्हेच’ हे नाटक करणारे अनेक कलाकार जन्माला येतात. त्यांची वाहवा होते तोपर्यंत ते रंगमंचावर प्रकाशझोतात राहतात. टाळ्या संपल्या की आपसूक खाली उतरतात. त्यामुळे आई, तू इथल्या जनतेला एकदा समजावून सांग गं, “हात तुमचे स्वतःचे आहेत. ते टाळ्या वाजवण्यापूर्वी अंत:करणातल्या देवाला आठवून,
स्वतःसमोरच प्रामाणिकपणे जोडले की, ‘कर्म,भक्ती आणि ज्ञान’ यांचा ‘त्रिवेणी संगम’ आयुष्याचे तीर्थक्षेत्र करतो.”
एकदा तीर्थक्षेत्रामध्ये जगायला सुरुवात झाली ना की मग उगाचच इकडे तिकडे धावपळ होत नाही, चिडचिड, नकारात्मकता हळूहळू कमी व्हायला लागते. जीवनाचा अर्थ उमगायला लागतो.
वाचावे मन पाण्याचे
वेचावे क्षण गाण्याचे
मग लागते कळू
हळूहळू
अंत:रंग हे जगण्याचे !
हे माय माऊली, तुझ्या मुलांना स्वतःच्या आयुष्यासाठी एवढा वेळ मिळावा म्हणून तू प्रार्थना करशील का गं? खरं तर ‘त्वमेव माता, पिता त्वमेव’ हा संस्कार करणाऱ्या या देशात कोणाचं काही चुकत असेल तर वेळप्रसंगी तू कान धरूनही शिकवतेसच. ‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम’ हे तुझं मूळ शिक्षणसूत्र आहे. मात्र रागवायचं नाही, मारायचं नाही अशी आधुनिक सूत्रं अस्तित्वात आल्यापासून तुझ्या कृष्णाची बासरी छडीचे काम करते बघ. हेच माय माऊली तुझं सौंदर्य वाढवणारं माधुर्य आहे.
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•
कृपाळू भगवंत !
देवा काय तुझं नाव
अन् कोणता रे गाव?
कोणी म्हणे राम
रहीम म्हणे कोणी
देव नाही देव नाही
असे तुज चिंते कोणी !
देव हसे गालात
अन् उत्तरे हृदयात
घेशी सगुणाचा संग
तरी चढे निर्गुणाचा रंग
‘सद् भाव’ माझे नाव
गाव मायाळू – दयाळू
आशीर्वदत म्हणे जा सांग
अक्षय्य होईल हा अभंग!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मॉं!
https://www.facebook.com/share/1GZAE72Ttb/

THE MOTHER ALONE KNOWS SRI AUROBINDO ‘THE AVATAR’
We lived the last twelve years of his life following him like a shadow. We saw how much the Divine in the form of Guru, the Avatar, works, suffers for our ‘confounded humanity.’ He has said, “My yoga is not for myself, I need nothing, neither salvation nor anything else, but precisely for the earth-consciousness, to open a way for the transformation of the earth-consciousness.”
We have also watched the tragedy of his passing away in a normal tranquil manner like a common man, not like some yogis who give up the body in meditation. Like Sri Ramakrishna, he took up the disease, allowed its natural course and reached the natural end. His whole life was an extraordinary phenomenon, but its external form so simple, natural and human, so to say, concealed the inner miracle. What we have seen are nothing but a few waves, small and big, on the surface, while his true life was ‘never on the surface’. The depth of that life will always remain unfathomable.
The Mother alone knows what he was and what he has done for the world. One day the world will wake up to a recognition and accept him as the Avatar, the World-Teacher.
-Selected Essays and Talks by Nirodbaran
——————————————————————————————–
•| ॐ |•
माय ही माऊली माऊली मनाची
माय ही सावली सावली जनाची
कणाकणात आहे मायेची माया
जो जाणतो ही ब्रह्म कळे तया !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
संपूर्ण समर्पण मा!
——————————————————————————————–
•| ॐ |•
माता सांगे देवा तुझे रूप
वर रंग काळा आत अप्रूप
भक्तहित हे वसे उभयमनी
का उगाच सोडून गेली
रुक्मिणी?
भक्तसाद ती ऐकून पुंडलिकाची
कर कटी ठेवून कथा सांगे विटेची
सोडून राधा,
गेला कृष्ण तिच्याच पाठी
कशा सुटतील जन्म गाठी?
सांगण्या,
गृहस्थाश्रमी कसे असावे ‘अंतर’
द्वैत साकारुनी उभे अद्वैत निरंतर!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
https://www.facebook.com/share/p/1FjmaG6x6q
संपूर्ण समर्पण !
प्रतिक्रिया व्यक्त करा