विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

कृष्णं वंदे जगद्गुरूम् !

गोकुळाष्टमी व शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥

आज (०४ सप्टेंबर ) गोकुळाष्टमी आणि उद्या डॉ. राधाकृष्णन् यांची जयंती अर्थात शिक्षकदिन आहे. हा एक दुग्धशर्करा योग आहे. मी ज्या शाळेत शिकले त्या माझ्या ‘शारदा मंदिर कन्या प्रशालेचा’ आज वर्धापन दिन आहे. त्या शिक्षणाने माझ्या जीवनात पेरलेले माधुर्य माझ्या मनात ‘शरदाच्या चांदण्या’सारखे पसरत चालले आहे. का कोणास ठाऊक पण या क्षणी आठवण येती आहे ती ‘भागवत बाईंची’. त्यांची ती करडी शिस्त आणि चेहे-यावरचे प्रेमळ हसू कदाचित आजही सांगत आहेत – ‘शिस्त गुणगुणता आली पाहिजे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु !


अल्प प्रतिसादात ‘शोध स्वत:चा’ साजरा झाला. हा शोध मात्र अविरतपणे सुरु राहण्यासाठी ‘ज्ञानोत्सव’तर्फे हार्दिक शुभेच्छा !


•| ॐ |•
https://youtu.be/NS-4quuFwSE?si=VL51Ux71vYeg0A4X

शब्दवेध

शिवाशिव

MUN पूर्ण करून आभा घरी आली. तिथे तिचं झालेलं कौतुक, मिळालेल्या चिठ्ठ्या आणि भेटलेल्या पूजा मॅडम, त्यांनी केलेली शर्विलची आठवण ; असं बरंच काही सांगत होती. माझ्या प्रसन्न आणि समाधानी लेकीला पाहून माझं मन प्रसन्न झालं नाही तरच नवल!
लिगामेंट इन्जुरीमुळे दुखत असलेल्या पायाचा बेल्ट काढून मला बर्फाने जरा शेकायचं होतं. तीन पैकी दोन बेल्ट निघाले. तिसरा काही निघेचना. तो काढण्यासाठी मी आभाला सांगितलं. ती म्हणाली, “अगं आई, हा बेल्ट इथे शिवलेला आहे. तो तिथून निघणारच नाही. हे इथे पुढे वेलक्रो लावलेलं आहे. तिथून तो काढायचा, असं म्हणत तिने सहजतेने बेल्ट काढून दिला आणि दुखरा पाय बर्फाने शेकत मी मनाने तिच्या आनंदात रमले.”
तिच्या गोंडस शब्दांनी आणि कृतीने माझ्या मनामध्ये शब्द पेरला ‘शिवाशिव’ !
‘शिवाशिव’ या शब्दाला माझ्या दृष्टीने फार मोठा सांस्कृतिक अर्थ लाभलेला आहे. अगदी चटकन कोणाच्याही लक्षात येणारा याचा अर्थ म्हणजे चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये मानली गेलेली अशी ‘शिवाशिव’. आपल्या मानवी समाजाने ती फार दीर्घकाळपर्यंत मानली, त्यानुसार अंमलबजावणी केली हा एक फार मोठा असा इतिहास आहे. का कुणास ठाऊक पण मला मात्र वाटतं ‘शिवाशिव’ ही संकल्पना ज्या पद्धतीने अमलात आणली गेली तो त्याचा मूळ अर्थ नाहीच.
‘शिवाशिव’ या शब्दाचा विचार करताना मला त्यामध्ये ‘शिव’ आणि ‘अशिव’ असे दोन स्पष्ट शब्द दिसतात. ‘शिव’ म्हणजे ‘मंगल’ आणि ‘अशिव’ म्हणजे ‘अमंगल’. किती साधे, सोपे, सरळ आणि स्पष्ट अर्थ आहेत हे ! माणसाने मात्र त्याचा फार चुकीचा अर्थ लावून ; मानवतेलाच हरवून टाकले. काय यातना भोगल्या असतील त्या जीवांनी ज्यांना या ‘शिवाशिव’ संकल्पनेचे बळी ठरावे लागले. महाभारतातल्या कर्णापासून आज कर्णोपकरणी पसरणाऱ्या अनेक बाबी मला आपसूकच डोळ्यासमोर येतात. कानांच्या जवळ डोळे असतात आणि दोन डोळ्यांच्या मध्ये नाक असते याचा विसर पडला की माणूस अफवांवर विश्वास ठेवायला लागतो. या डोळ्यांनी बघणारा ‘मी’ आणि त्या दृष्टीवर जगणारा ‘मी’ जेव्हा स्वतःला ओळखतो आणि त्या ‘मी’ पणाचा त्याग करतो ; तेव्हा ‘आम्ही’ मध्ये तो नव्याने जन्मतो. हे सारं ‘शिवत्व’ आहे ; याहून जे निराळे ते कदाचित ‘अशिवत्व’ म्हणजेच ‘अमंगल’ असावे.

संपूर्ण समर्पण मॉं!
श्रीरामवरदायिनी!


देव अंत:करणात राहतो म्हणून माणसाने नेहमी प्रसन्न राहावे.

•| ॐ |•

मातृ कृपा

विद्यार्थ्यांना शिकवताना ‘क्षर’ आणि ‘अक्षर’ यातील फरक सांगताना मी कायम विचारात पडायचे ; आता ‘ध्वनी’ ध्वनिमुद्रित करता येतो मग तो ‘क्षर’ राहिला नाही असे मला वाटायचे. पण माय माऊली आज तुझ्या कृपेने कळले ‘क्षर’ म्हणून निर्देशिला गेलेला ध्वनी हा ‘आतला आवाज’ आहे. जो कदाचित समान पातळीवरून साधना करणाऱ्यांना एकमेकांचा ऐकू जातो मात्र ध्वनिमुद्रित करता येत नाही. म्हणून देवा, आजही ‘अक्षर’ म्हणजेच लिहिणे, टिकवून ठेवणे महत्त्वाचे.

        आई सांगते, 'केवळ अक्षर महत्त्वाचे नाही तर हस्ताक्षर महत्त्वाचे ; कारण त्यातून संपूर्ण अस्तित्व व्यक्त होते.'

हे परमेश्वरा, शिक्षकाला फळ्यावर लिहितं ठेव, एवढीच प्रार्थना!

श्रीरामकृष्णार्पणमस्तु!

पृष्ठे: 1 2

प्रतिक्रिया व्यक्त करा